नव्या दरप्रणालीला विरोध म्हणून ‘प्राइम टाइम’ला म्हणजेच सायंकाळी ७ ते रात्री १० या कालावधीत केबल बंद न ठेवण्याचा भारतीय नियामक दूरसंचार प्राधिकरणाचा (ट्राय) इशारा झुगारत मुंबईत गुरुवारी सायंकाळी केबलचालकांकडून प्रक्षेपण बंद ठेवण्यात आले. नेहमीच्या कार्यक्रमांना मुकावे लागल्याने ग्राहक निराश झाले.
ट्रायने बुधवारी नवे पत्रक काढून प्रक्षेपण कंपन्या आणि स्थानिक केबलचालकांना २९ डिसेंबरपासून सशुल्क वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद न करण्याचा आदेश दिला होता. मात्र, ट्रायच्या नव्या नियमांविरोधात केबलचालकांमधील असंतोष अद्याप मावळलेला नाही.
केबल व्यावसायिकांच्या बैठकीत आधी ठरल्याप्रमाणे ट्रायचे नियम झुगारून गुरुवारी प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर ठाम राहत मुंबईत सर्वत्र ‘ब्लॅक आऊट’ करण्यात आले. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केबल व्यावसायिकांच्या संघटनांकडून करण्यात आला आहे. ‘स्टार इंडिया’च्या विरोधात मोर्चा काढण्याच्या आणि यापुढे स्टारची एकही वाहिनी न दाखवण्याच्या निर्णयावरही ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून वृत्तपत्र, वृत्त वाहिन्या आणि समाजमाध्यमांवरून गुरुवारी होणाऱ्या ब्लॅक आऊटबाबत माहिती देण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी सात वाजता केबल बंद होताच, याची कल्पना नसलेल्या अनेक ग्राहकांनी केबल कार्यालयांमध्ये फोन केले. कार्यक्रम हुकल्याने त्यांची निराशा झाली.
‘ट्राय’ची बाजू
नवी दरप्रणाली लागू होण्यासाठी काही तास बाकी राहिलेले असताना प्रक्षेपक कंपन्या आणि केबल व्यावसायिकांकडून प्रेक्षकांची अडवणूक होऊ नये यासाठी ट्रायने नवा आदेश संकेतस्थळावर जाहीर केला होता. त्यानुसार, यापुढे अशा प्रकारे सशुल्क वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करता येणार नाही. नव्या दर प्रणालीचे काम ३ जुलै २०१८ लाच पूर्ण झाले होते. त्यानंतर प्रक्षेपक कंपन्या एमएसओ, एलसीओ आणि डीटीएचचालकांना पुरेसा वेळ देण्यात आला होता.
‘ग्राहक आणि केबलचालकांचाही फायदा’
- ट्रायच्या नव्या नियमानुसार, २९ डिसेंबरपासून ग्राहकांना नको असलेल्या वाहिन्या घेण्याची सक्ती करता येणार नाही.
- ट्रायला बार्ककडून (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल) मिळालेल्या आकडेवारीनुसार सर्वसाधारण ग्राहक ४० पेक्षा कमी वाहिन्या बघतात. त्यामुळे त्यांना महिन्याची भाडेआकारणी ते सध्या भरत असलेल्या रकमेपेक्षा कमीच असणार आहे.
- मल्टिपल सिस्टिम ऑपरेटरप्रमाणे बदलत्या काळानुसार अपडेट ठेवले तर लोकल केबलचालकांनाही फायदा होणार आहे, असे ट्रायचे म्हणणे आहे.