मुंबई : ‘मराठी चित्रपटसृष्टीची स्पर्धा ही हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांशी असून मराठी चित्रपटांचे निर्मिती मूल्यही भव्य असायला हवे. तीन ते चार कोटींच्या निर्मिती खर्चात तयार होणारा मराठी चित्रपट स्पर्धेत तग धरू शकत नाही. त्यामुळे मराठीतही भव्य चित्रपटांची निर्मिती होणे गरजेचे आहे’, असे स्पष्ट मत दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्लोव्हेनिया देशात चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट ‘एक राधा एक मीरा’चा ट्रेलर लॉंच सोहळा शुक्रवारी मुंबईत पार पडला. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित आणि अविनाशकुमार प्रभाकर आहाले निर्मित या चित्रपटात एक सांगीतिक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्याला निर्माते व दिग्दर्शक यांच्यासह अभिनेता गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले, संदीप पाठक हे चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटाची पहिली झलक लोकांसमोर आणण्याच्या निमित्ताने मांजरेकर यांनी सध्या मराठी चित्रपटांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांविषयी आपले मत मांडले.

‘मराठीत उत्तम अशा आशयप्रधान चित्रपटांची निर्मिती होते. दर्जेदार आशयाबरोबरच उत्तम निर्मितीमूल्ये आणि भव्य स्तरावर मराठी चित्रपटांची निर्मिती झाली. प्रेक्षकांनाही ते आवडले, तर नावाजलेल्या ओटीटी माध्यमांवरही हे चित्रपट विकत घेतले जातील. सध्या ओटीटी माध्यमामुळे प्रेक्षकांना जगभरातील वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट घरबसल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वेगळी धाटणी असलेले लक्षवेधी मराठी चित्रपट आले तर ओटीटी माध्यमावरही त्यांना उत्तम स्थान मिळेल आणि आपले चित्रपट इतर भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील’, असेही मांजरेकर म्हणाले.

नाट्यगृहात चित्रपट दाखविणे स्वागतार्ह, पण…

नाट्यगृहात चित्रपट दाखविण्याची कल्पना स्वागतार्ह आहे, त्यामुळे मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. परंतु आजही महाराष्ट्रातील पन्नास हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या अनेक गावांमध्ये आणि निमशहरी भागांत चित्रपटगृहे नाहीत. परिणामी, या प्रेक्षकांपर्यंत मराठी चित्रपट कसे पोहोचणार, असा सवाल उपस्थित करीत निमशहरी व ग्रामीण भागात चित्रपटगृहे उभारण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्या ठिकाणी प्राधान्याने मराठी चित्रपटांचे प्रयोग लावण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट मतही महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trailer launch ceremony of first marathi film ek radha ek meera shot in slovenia held in mumbai on friday mumbai print news sud 02