मुंबई : ‘आयुष्यात तुमचा पहिला प्रभाव महत्वाचा असतो आणि ही छाप पाडायला दुसरी संधी मिळत नाही. सूरज चव्हाण याचा प्रवास अतिशय महत्त्वाचा असून त्याने प्रेक्षकांवर स्वतःचा विशेष प्रभाव पाडला आहे. त्यामुळे सूरज चव्हाणचा खूप अभिमान आहे. मी ‘झापुक झुपूक’ चित्रपटासंदर्भात उत्सुक होतो आणि ट्रेलर पाहिल्यानंतर एवढेच सांगेन की हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार आहे’, असे मत प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच दरम्यान व्यक्त केले.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ या मराठी चित्रपटात सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असून जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकारही झळकत आहेत. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट ‘झापुक झुपूक’ चित्रपटातून मांडण्यात आली असून प्रेमकथेसह भावभावनांचे मिश्रण पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट शुक्रवार, २५ एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या पार्शभूमीवर रितेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील दादर येथे शुक्रवार, ११ एप्रिल रोजी ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. तसेच सूरज चव्हाण याच्या पाच बहिणीही उपस्थित होत्या.
‘झापुक झुपूक’ चित्रपटाची कल्पना माझ्या डोक्यात होती. पण ‘डिव्हाइस’ म्हणजेच मुख्य नायक सापडत नव्हता. पण मला ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने सूरज चव्हाण या मुलामध्ये ते पात्र मिळाले. तसेच मराठी चित्रपट हे कोणत्याही नटाच्या आणि दिग्दर्शकाच्या नावाने चालत नाही. मराठी चित्रपट हे पात्रांमुळे चालतात आणि ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या निमित्ताने सूरज चव्हाण हे पात्र सर्वांसमोर आले आहे. तसेच कोणत्याही मराठी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत’, असे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नमूद केले. तसेच ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या संकल्पनेवर चर्चा करण्यापासून ते ट्रेलर लॉंचपर्यंत रितेश देशमुख भाऊ माझ्यासोबत आहेत याचा मला आनंद आहे, असेही केदार शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
मला चाहत्यांना आनंदात पाहण्याची सवय : सूरज चव्हाण
मला चाहत्यांना दुःखात पाहायची सवय नाही. माझ्या सर्व चाहत्यांनी आनंदात राहावे आणि त्यांना हसविण्यासाठी मी समाजमाध्यमांवर रील्स बनवतो. मला केदार शिंदे सरांनी खूप प्रेम आणि अभिनयाचे धडे दिले. ‘झापुक झुपूक’ चित्रपटासाठी मी, केदार शिंदे सर आणि संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि हा ‘झापुक झुपूक’ चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पहा, असे आवाहन सूरज चव्हाण याने केले.