मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांमधील आपत्कालीन साखळी विनाकारण खेचण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वेची वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. एप्रिल महिन्यातील पहिल्या २० दिवसांत विनाकारण साखळी खेचल्याच्या १५७ घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
प्रवाशांनी गंभीर कारणाशिवाय रेल्वे डब्यातील आपत्कालीन साखळी खेचून रेल्वेगाडी थांबवल्यास रेल्वे अधिनियमातील १४१व्या कलमाचा भंग होतो. त्यानुसार संबंधित प्रवाशांना ताब्यात घेऊन रेल्वे दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात येते. अशा प्रवाशांना ५०० ते १००० रुपयांपर्यंत दंड किवा एक वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र नियमामध्ये दंड आणि शिक्षेची तरतूद असतानाही अनेक प्रवासी विनाकारण साखळी खेचतात आणि त्याचा मनस्ताप रेल्वेसह अन्य प्रवाशांना सहन करावा लागतो.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोकल, तसेच एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असून त्यामुळे गाडय़ा काही मिनिटे थांबतात आणि त्याचा अन्य गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. १ ते २० एप्रिल २०२२ या कालावधीत विनाकारण साखळी खेचल्याच्या १५७ घटना घडल्या. यामध्ये १०८ प्रवासी दोषी आढळले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण ४७ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
साखळी खेचण्याची कारणे
गाडीचा थांबा नसलेल्या ठरावीक ठिकाणी उतरणे, सहप्रवासी वेळेत न येणे किंवा फलाटावरच थांबणे, फलाटावर सामान विसरणे, गाडीतून मोबाइल खाली पडणे, अपंगांच्या डब्यातून अन्य प्रवाशांचा प्रवास यासह विविध कारणांसाठी साखळी खेचण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.
साखळी खेचल्यावर नेमके काय घडते?
धावत्या रेल्वेगाडीत साखळी खेचल्यावर ब्रेकच्या पोकळ कक्षात मोकळी हवा शिरते आणि त्यामुळे आपोआप ब्रेक लागतो. अशा वेळी गाडी पुढे जाणे शक्य नसते. तसेच साखळी खेचण्यात आलेल्या डबाच्या टोकाला असलेली एक पट्टी आडवी पडते. त्यानंतर गार्ड किंवा साहाय्यक लोको पायलट यांच्यापैकी जो अधिकारी जवळ असेल, त्याला त्या डब्यापर्यंत जावे लागते. तसेच आडवी पडलेली पट्टी पुन्हा सरळ करून ब्रेकच्या कक्षातील मोकळी हवा बाहेर काढून पुन्हा पोकळी तयार करावी लागते.
‘साखळी’मुळे २० दिवसांत १५७ वेळा रेल्वेचा खोळंबा; मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका, क्षुल्लक कारणावरून आपत्कालिन साखळी खेचण्याच्या प्रकारांत वाढ, दोषी प्रवाशांना दंड
मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांमधील आपत्कालीन साखळी विनाकारण खेचण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे.
Written by अक्षय येझरकर
First published on: 26-04-2022 at 01:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Train chain hitting central railway traffic increase emergency chain pulling trivial reasons penalties guilty passengers amy