अनिश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) जवान चेतनसिंह चौधरी (३३) याच्या सेवा पुस्तिकेतील नोंदी तपासण्यात आल्या आहेत. त्यात त्याने यापूर्वीही तीन गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. २०१७ मध्ये चेतनसिंह याने एका मुस्लीम व्यक्तीला चौकीत विनाकारण आणून त्रास दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

चेतनसिंहविरोधात ३१ जुलैला रेल्वे सुरक्षा दलाकडून विभागीय चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या सेवा पुस्तिकेतील नोंदींचीही तपासणी करण्यात आल्या. चेतनसिंह २०१७ मध्ये उज्जैन येथील आरपीएफच्या श्वान पथकात कार्यरत होता. त्यावेळी त्याने वाहिद खान नावाच्या व्यक्तीला चौकीमध्ये विनाकारण त्रास दिला होता, तसेच त्याला धमकावले. या प्रकरणाची माहिती चेतनसिंहच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीनंतर सिंहवर कारवाईही करण्यात आली होती.

२०११ मध्ये हरियाणामध्ये कार्यरत असताना त्याने एका सहकाऱ्याच्या एटीएम कार्डद्वारे २५ हजार रुपये काढले होते. तसेच गुजरातमधील भावनगर येथे कार्यरत असताना त्याने महेश चव्हाण नावाच्या सहकर्मचाऱ्याला मारहाण केली होती. दोन्ही प्रकरणांमध्ये त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती.

जयपूर – मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये चार प्रवाशांना गोळय़ा झाडून हत्या करणाऱ्या चेतनसिंह बोरिवली रेल्वे पोलिसांच्या अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. गोळीबारात आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना (५८), अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसैन भानपूरवाला (४८), अख्तर अब्बास अली (४८) यांच्यासह हैदराबादच्या नामपल्ली विभागातील रहिवासी सैयद सैफुल्लाह यांचा मृत्यू झाला. आरोपीची धार्मिक तेढ निर्माण करणारी एक ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली होती. ती ध्वनिचित्रफीत चेतनसिंहचीच असल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून पडताळणी करण्यात आली आहे. याशिवाय आरोपीने गोळीबाराच्या दिवशी एका मुस्लीम महिलेला रायफलच्या धाकावर ‘जय माता दी’चा जयघोष करण्यास सांगितले होते. महिलेच्या जबाबात ही माहिती उघड झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Train firing case chetansingh has committed three misdemeanors in the past amy
Show comments