मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे नाॅन इंटरलाॅकिंची कामे करण्यात आली. मात्र, त्यानंतर सलग तीन दिवस लोकलचा खोळंबा सुरू आहे. मध्य रेल्वेवरील लोकल फेऱ्या बुधवारीही ३० ते ३५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी केलेल्या कामांमध्ये घोळ झाल्याने त्याचा शारीरिक-मानसिक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम यादव यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम यशस्वीपणे पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, हा दावा फोल ठरल्याची टीका प्रवाशांकडून होऊ लागली आहे.

हेही वाचा >>> मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू; धरणांतील जलसाठा ६ टक्क्यांवर

मध्य रेल्वेवरील ठाणे येथील फलाट क्रमांक ५-६ वरील कामे सुरू असल्याने ६३ तासांचा आणि सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १०-११ चे विस्तारीकरण व पायाभूत कामांसाठी ३६ तासांचा ब्लाॅक घेण्यात आला होता. या काळात एकूण ९३५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. ब्लाॅक काळात रेल्वेतून प्रवास करताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रचंड धावपळ करावी लागली. त्यामुळे अनेकांची दमछाक झाली. मात्र, भविष्यात रेल्वेमध्ये सुधारणा होईल व प्रवास सुकर होईल या विश्वासाने प्रवाशांनी प्रचंड अडचणीचा सामना केला. ब्लाॅक पूर्ण झाल्यानंतर लोकल सेवा सुरू झाली. मात्र, सोमवारी पहाटेपासून सीएसएमटीत नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. तसेच कोपर – दिवा दरम्यानही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक पुरते कोलमडले. लोकलचा वेग अत्यंत कमी झाल्याने लोकल एकामागोमाग एक उभ्या होत्या. तर, परळ येथे मंगळवारी पहाटे ४.३० वाजता सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. लोकल मंगळवारी रात्री ८.३० नंतरही ५० ते ६० मिनिटे विलंबाने धावत होत्या.

हेही वाचा >>> ४७ कोटींच्या अपहाराप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल; आर्थिक गुन्हे शाखा करतेय तपास

तब्बल एक तास लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रात्रीची सीएसएमटी-डोंबिवली धीमी लोकल जलद केल्याने, धीम्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे त्यांना गर्दीमय लोकलमधून प्रवास करण्यास भाग पडले. कल्याण – कसारा आणि कल्याण – कर्जतदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इच्छित स्थानकात पोहोचण्यास विलंब झाला. त्यानंतर त्यांना पुढील प्रवास करताना अनेक अडचणी आल्या. तर, बुधवारीही अनेक लोकल ३० ते ३५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. तसेच दुपारपासून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल – जलद करण्यात आल्या. सलग तीन दिवस प्रवाशांना त्रास होत असून, प्रवाशांना मध्य रेल्वेच्या ‘एक्स’ॲपवरून इत्यंभूत माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. बुधवारी एका मागोमाग एक लोकल उभ्या होत्या. तांत्रिक बिघाडाबाबत माहिती न दिल्याने प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Story img Loader