मुंबई : झाडाला योग्य आकार देण्यासाठी, तसेच फांद्यांची वाढ नियंत्रित करण्यासाठी झाडांची शास्त्रोक्त पद्दतीने छाटणी करण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या उद्यान खात्यातर्फे कामगार व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसित करण्यावर देण्यात आला.
दरवर्षी पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे आदी घटना घडतात. त्या दुर्घटनेत आतापर्यंत अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. महापालिकेच्या उद्यान खात्यातर्फे पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणी केली जाते. कामगारांना शास्त्रोक्त माहिती नसल्याने झाडाचा समतोल राखला जावा यादृष्टीने झाडाची छाटणी करण्यात येत नाही. त्यामुळे झाडांचे सौंदर्य नष्ट होते आणि वाढही व्यवस्थित होत नाही. अनेकदा घरे, विजेच्या तारा, रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर झाडाच्या फांद्या पडतात. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीसह वित्तहानी देखील होते. ही समस्या टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन उद्यान खात्यातील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना शास्त्रोक्त पद्धतीने झाडांची छाटणी कशी करावी याचे प्रशिक्षण देत आहे.
उद्यान खात्याने नुकत्याच आयोजित केलेल्या प्रशिक्षणात झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करणे, त्यासंदर्भातील योग्य पध्द्ती, जोखमीचे मूल्यमापन करून अनावश्यक वृक्षतोड टाळणे याबाबत माहिती देण्यात आली. वृक्षतज्ज्ञ विवेक राणे यांनी कर्मचाऱ्यांना थ्री कट पद्धत, कॅनोपी कपात याबाबत प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यशाळेत सर्व कंत्राटदार, उद्यानतज्ज्ञ, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, सहाय्यक उद्यान अधीक्षक तसेच परिमंडळ ५ आणि परिमंडळ सहाचे उप उद्यान अधीक्षक उपस्थित होते. दरम्यान, परिमंडळ २ मधील जी उत्तर, जी दक्षिण, एफ उत्तर व एफ दक्षिण विभागातील महानगरपालिकेचे तसेच कंत्राटदाराचे कामगार, कर्मचाऱ्यांनाही पूर्वी वृक्षछाटणीसंदर्भांत प्रशिक्षण देण्यात आले.
छाटणीमुळे झाडांना हवा तसा आकार देता येतो. त्यामुळे झाड अधिक सुंदर आणि मजबूत होते. छाटणी केल्यामुळे फांद्यांची अनावश्यक वाढ थांबते. काही झाडांमध्ये योग्य छाटणी केल्याने फळधारणा वाढते आणि त्यांची गुणवत्ताही सुधारते. शिवाय मृत किंवा खराब झालेल्या फांद्या छाटल्याने रोग आणि किडींना प्रतिबंध करणे शक्य होते. महानगरपालिकेतर्फे वर्षभर झाडांची छाटणी केली जाते. मात्र, पावसाळ्यापूर्वी त्यावर आणखी भर दिला जातो. पावसाळ्यापूर्व छाटणीला उद्यान विभागाने सुरुवात केली असून त्याअंतर्गत धोकादायक झाडे, अनावश्यक फांद्यांची छाटणी केली जात आहे.