जुईनगर स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत तंत्रिक बिघाड झाल्यामुळे गुरुवारी सकाळी ६ च्या सुमारास सीएसएमटी-पनवेल हार्बर आणि ठाणे-वाशी, पनवेल ट्रान्स हार्बर लोकल सेवा ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. अद्याप लोकल विलंबाने धावत असून कार्यालयात जाणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
जुईनगर रेल्वे स्थानकात गुरुवारी सकाळी ६ वाजता सिग्नलमध्ये बिघाड झाला. सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्याने लोकल चालवण्यात अडथळा येऊ लागला.
हेही वाचा >>>मुंबईः शाळेत चोरी करणारा चोर अटकेत
ट्रान्स हार्बरवरील सीएसएमटी-वाशी हार्बर आणि ठाणे-नेरुळ अशी लोकल सेवा सुरू होती. मात्र या मार्गावरील लोकलही विलंबाने धावत होत्या. सिग्नलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी साधारण एक तास लागला आणि त्यानंतर संपूर्ण हार्बर तसेच ट्रान्स हार्बर सेवा पूर्ववत करण्यात आली. तरीही या मार्गांवरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असून प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. तसेच कार्यालयात पोहोचण्यास विलंब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.