सलग दुसऱ्या दिवशी ओव्हरहेड वायर तुटली; ५०हून अधिक सेवा रद्द
‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला’ ही म्हण रेल्वेच्या बाबत खूपच खरी ठरत असून, कावळा बसायला आणि ओव्हरहेड वायर तुटायला एकच वेळ साधत आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर सोमवारी रबाळे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरच्या इन्सुलेटरवर कावळा बसल्याने ओव्हरहेड वायर तुटण्याची घटना घडली. रविवारी ऐरोली-ठाणे यांदरम्यान अशाच घटनेमुळे ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. सोमवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ओव्हरहेड वायर तुटल्याने या मार्गावरील वाहतूक तीन तास बंद होती. परिणामी प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेच्या या बिघाडाचा थेट परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला आणि ठाणे-बेलापूर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
सोमवारी रबाळे स्थानकाजवळ अप मार्गावरील ओव्हरहेड वायर सकाळी ८.४० वाजता तुटली. या वायरच्या इन्सुलेटरवर पक्षी बसल्याने ही वायर तुटल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने अप आणि डाउन मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद झाली आणि ठाण्यापासून सर्वच स्थानकांवर प्रवाशांची एकच झुंबड उडाली.
हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वेने सामान पोहोचणे शक्य नसल्याने काही सामान आणि कामगार रस्त्यावाटे पाठवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने ही सामुग्री घटनास्थळी पोहोचण्यासाठी विलंब झाला. त्यानंतर कुर्ला-वाशी मार्गे रेल्वेने काही सामुग्री रवाना करण्यात आली. अखेर दुपारी १२.००च्या सुमारास हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र तोपर्यंत तब्बल तीन तासांहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद होतील.
या तीन तासांत ट्रान्स हार्बर मार्गावरील एकूण ५० सेवा रद्द करण्यात आल्या. या सेवा सकाळी पावणेनऊ ते साडेअकरा या ऐन गर्दीच्या वेळी रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांनी मग रस्त्यावाटे आपली कार्यालये गाठायला सुरुवात केली. मात्र त्यामुळे ठाणे-बेलापूर, मुलुंड-ऐरोली या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. अध्र्या तासाचे अंतर कापण्यासाठी लोकांना सोमवारी सकाळी दीड तासांचा कालावधी लागल्याने अनेकांची गैरसोय झाली.

Story img Loader