मुंबई : मुंबई महापालिकेतील दोन उपायुक्त, दोन विभागांचे मुख्य अभियंता १ जुलै रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. आधीच महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त असून आता सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून उपप्रमुख अभियंत्यांकडे प्रमुख पदाचा कार्यभार असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प विभागाचे संचालक संजय कौडीण्यपुरे, विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त चक्रधर कांडलकर, पूल विभागाचे प्रमुख अभियंता विवेक कल्याणकर, परिमंडळ ६ चे उपायुक्त रमांकांत बिरादार ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी १ जुलैपासून नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : आरोपी अंगरक्षकाच्या सहभागाचा दावा संशयास्पद, सत्र न्यायालयाचे मत

मलनिस्सारण प्रकल्प विभागाचे प्रुमख अभियंता शशांक भोरे यांच्याकडे आभियांत्रिकी सेवा व प्रकल्प विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर कांडलकर यांच्या जागी इमारत परिक्षण विभागाचे प्रमुख अभियंता यतीन दळवी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील पदाच्या कामकाजाबरोबरच अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. पूल विभागाचे प्रभारी प्रमुख अभियंता विवेक कल्याणकर हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागी पूल विभागाचे उपप्रमुख अभियंता उत्तम श्रोते यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना आपल्या पदाबरोबरच अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सागरी किनारा मार्गाचे प्रमुख अभियंता गिरीश निकम यांच्याकडे आपल्या पदाव्यतिरिक्त रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

प्रमुख लेखापाल (कोषागार) हे पद देखील १ जुलैपासून रिक्त होत आहे. उपप्रमुख लेखापाल पूजा शेटे यांच्याकडे प्रमुख लेखापाल (कोषागार) या विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

हेही वाचा – पाच महिन्यांत राज्यात एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

सहाय्यक आयुक्तांच्या पदांमध्ये बदल्या करण्यात आल्या असून सर्व सहाय्यक आयुक्तांना आपल्या पदाबरोबरच अन्य पदांचा अतिरिक्त भारही देण्यात आला आहे. उपायुक्त रमाकांत बिरादार सेवानिवृत्त झाल्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच त्यांची बदली डोंगरी, माझगावच्या सहभाग असलेल्या बी विभागात करण्यात आली आहे. तर वरळी प्रभादेवीचा भाग असलेल्या जी दक्षिण विभागात मृदुला अंडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाबरोबरच या पदाचा कार्यभारही देण्यात आला आहे. दादर माहीमचा भाग असलेल्या जी उत्तर विभागातील कार्यकारी अभियंता विष्णू विधाते यांच्याकडे स्वत:च्या पदाबरोबरच गिरगाव, मुंबादेवीचा भाग असलेल्या सी विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा भार देण्यात आला आहे. वर्सोव्यातील कारवाईमुळे चर्चेत आलेले सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहाण यांच्याकडे सध्या वडाळामधील एफ उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार आहेच, त्याचबरोबर त्यांच्याकडे बाजार विभागाचे प्रमुख पदही देण्यात आले आहे.

दरम्यान, सहाय्यक आयुक्त पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कार्यकारी अभियंता व उपप्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवले आहेत. पालिकेत सध्या सहाय्यक आयुक्तांच्या सुमारे ५० टक्के जागा रिक्त असून अनेक विभागांना पूर्ण वेळ सहाय्यक आयुक्त नाहीत, त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची बढतीही रखडली आहे. अनेक अधिकाऱ्यांना एकापेक्षा अधिक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपप्रमुख अभियंता व कार्यकारी अभियंता पदावर कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असलेल्या, सक्षम व निष्कलंक सेवा असणाऱ्या इच्छुक अधिकाऱ्यांकडून ५ जुलैपर्यंत अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या १० जुलै रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transfer in mumbai municipal corporation mumbai print news ssb