मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने अंधेरी, जोगेश्वरी पश्चिमेचा भाग असलेल्या के पश्चिम विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली केली. त्यांना वडाळा, शीवचा भाग असलेल्या एफ उत्तर विभागात पाठवण्यात आले आहे. के पश्चिम विभागाच्या अखत्यारित असलेल्या वर्सोवा भागात गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू आहे. त्यातूनच राजकीय हेतूने त्यांची बदली करण्यात आल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे.

डॉ. पृथ्वीराज चौहाण यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी एफ उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी तसे आदेश जारी केले. या आदेशामुळे पालिकेच्या वर्तृळात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पालिकेचा के पश्चिम विभाग चर्चेत आहे. या विभागामार्फत वर्सोवा परिसरात सीआरझेडच्या जागेवर अनधिकृत बांधकामांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर तोडक कारवाई करण्यात आली. गेले सलग तीन दिवस ही कारवाई सुरू आहे. या कारवाईदरम्यान अनधिकृतपणे बांधलेल्या इमारती पाडण्यात आल्या. त्यातच अचानक झालेल्या या बदलीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या बदलीमागे राजकीय हेतूने केलेल्या तक्रारी कारणीभूत आहेत का अशीही कुजबूज सुरू आहे.

हेही वाचा >>>सागरी किनारा मार्गाची एक वाहिन जुलैअखेर सुरू करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश

वर्सोवा येथे अनधिकृत बांधकामांकडे काणाडोळा केल्याप्रकरणी एका दुय्यम अभियंत्याचे गेल्याच आठवड्यात निलंबन करण्यात आले होते. के पश्चिम विभागाचे पदनिर्देशित अधिकारी स्वप्निल कोळेकर यांची देखील के पश्चिम विभागातून बदली करून त्यांना नगर अभियंता कार्यालयात परत पाठविण्यात आले. त्यानंतर पालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले होते. या पथकाने गेल्या तीन दिवसात मोठी कारवाई करून शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या तीन इमारती पाडण्यात आल्या. गेल्या १२ दिवसांत वर्सोवामध्ये तीन ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यातच सहाय्यक आयुक्तांची बदली झाल्यामुळे पालिका वर्तृळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, ही बदली नियमित आहे. के पश्चिम विभागात दोन वर्षे ११ महिने कार्यकाळ पूर्ण झाला असून माझा कार्यकाळ पूर्ण होत आल्यामुळे बदली करण्यात आली, असे सहाय्यक आयुक्त चौहाण यांनी सांगितले.