मुंबई : नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या विनयभंग प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश देत पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली. तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांची बदली करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले.
आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. रुग्णालयांत सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्याची सूचना एकनाथ शिंदे यांनी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर भूषण गगराणी यांना नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची तात्काळ कूपर रुग्णालयात बदली करण्याचे निर्देश दिले. नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरचा विनयभंग झाला असून, त्याची तक्रार मुख्य अंतर्गत तक्रार समितीकडे करण्यात आल्याचे कळताच डॉ. मेढेकर यांनी मुख्य अंतर्गत तक्रार समितीकडे विचारणा केली. मात्र त्यांनी तक्रार गोपनीय असल्याचे सांगून माहिती देण्यास नकार दिला. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने तपासामध्ये अडथळा येऊ नये यासाठी महिला डॉक्टरने आरोप केलेल्या डॉ. भेटे यांची शैक्षणिक कामातून प्रशासकीय कामात बदली केली. चौकशीनंतर समितीने डॉ. भेटे यांची अन्य रुग्णालयात बदली करण्याची शिफारस केली होती. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करण्याचे अधिकार अधिष्ठाता यांना नसल्याने त्यासंदर्भातील त्यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे शिफारस पत्र पाठवले. मात्र वरिष्ठांकडून तातडीने निर्णय न झाल्याने या प्रकरणात मेढेकर यांनी डॉ. भेटे यांना पाठीशी घातल्याचा आरोप चौकशी समिती, विद्यार्थी संघटना व काही राजकीय पक्षांकडून करण्यात आला.