पालिकेतील बदल्यांचे सत्र सुरूच असून निवडणूक, प्लास्टिक बंदी, मराठी पाट्या या विषयाशी संबंधित अधिकारीउप आयुक्त संजोग कबरे यांची बदली करण्यात आली आहे. तर सह आयुक्त विजय बालमवार यांना त्यांच्या जागी नियुक्ती देण्यात आली आहे.राज्यातील सत्तातरांतर पालिकेत प्रमुख अधिकाऱ्यांच्या मोठया प्रमाणावर बदल्या होत आहेत. यामागे राजकीय कारणे असल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे. आता उपायुक्त संजोग कबरे यांची बदली पश्चिम उपनगरातील परिमंडळ ४ मध्ये करण्यात आली आहे. तर परिमंडळ ४ चे सह आयुक्त विजय बालमवार यांच्याकडे उपायुक्त विशेष पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
हेही वाचा : मुंबई : कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम सुरु ; तीन महिन्यात पूल जमीनदोस्त होणार
बालमवार यांच्याकडे संपर्क अधिकारी (मागासवर्ग कक्ष), फेरीवाल्यांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचेही काम दिले आहे. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर विशेष सूक्ष्म पत पुरवठा सुविधेची अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच बेघर, अपंग, महिला यासाठीचे निधीचे नियोजन करणारा नियोजन विभागही बालमवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तसेच जिल्हा नियोजन व जिल्हा नियंत्रण आणि विकास परिषद (डीपीडिसी) ही कामे देखील त्यांच्याकडे आहेत. डीपीडिसी या विभागात मुंबईच्या पालक मंत्र्यांच्या विकास निधीतून कामे केली जातात. यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या विकास निधीतून काही कामांसाठी या विभागाने नियोजन केले होते. त्या कामांचे आता पुढे काय होणार याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.