मुंबई: परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये मोठी देवाण- घेवाण होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर आता मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बदल्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी, असे आदेश शिंदे यांनी दिले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मोठी देवाण-घेवाण झाल्याचे आरोप झाले होते. परिवहन विभागातील बदल्या माध्यमांमध्ये, विधिमंडळाच्या अधिवेशनांमध्ये चर्चेत असायच्या. त्यावर उपाय म्हणून शिंदे यांनी बदल्यांची कार्यवाही पारदर्शकपणे आणि संगणकीकृत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागाने ही प्रणाली विकसित केली असून त्याचे सादरीकरण विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी केले. त्यानुसार शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदलीची अंतिम यादी काढण्यात आली. १६६ मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९१ टक्के जणांना, तर ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९७ टक्के जणांना त्यांच्या पसंती क्रमानुसार बदली देण्यात आली आहे. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>>सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन मृत्यू प्रकरण : आदित्य ठाकरेंची उच्च न्यायालयात धाव

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांबाबत चिंता व्यक्त करीत अधिक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. समृद्धी महामार्गावर वाहनांना थांबवू नका. त्यांची वेगमर्यादा निश्चित करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांसोबत विशेष परिवहन अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

Story img Loader