मुंबई : मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या ब्रिटिशकाळातील भायखळा स्थानक लवकरच नव्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. रेल्वेच्या वैभशाली इतिहासाचा भाग असलेल्या या स्थानकाचे सुशोभीकरण करताना त्याच्या प्राचीन वास्तूंना मात्र धक्का लावण्यात आलेला नाही.
मध्य रेल्वेने एका स्वयंसेवी संस्थेमार्फत हे काम पूर्ण केले आहे. सुशोभीकरण केलेल्या भायखळा स्थानकातील प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन २९ एप्रिलला दुपारी १२ वाजता याच स्थानकातील फलाट क्रमांक १ वर होणार आहे.
भायखळा स्थानक १८५३ मध्ये आकारास आले. या स्थानकात दोन धीम्या आणि दोन जलद मार्गिका आहेत. अशा या स्थानकातून दिवसभरात लाखो प्रवासी प्रवास करतात. ब्रिटिशकालिन असलेल्या या स्थानकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. यासाठी एका स्वयंसेवी संस्थेनेही पुढाकार घेतला. या स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला जुलै २०१९ मध्ये सुरुवात झाली. हे काम दीड वर्षांत पूर्ण करण्यात येणार होते. मात्र करोनाकाळात काम बंद झाले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास तीन वर्षे लागली. सुशोभीकरणाच्या कामासाठी चार कोटी रुपये खर्च आला आहे.
स्थानकातील छताची ठेवण पुरातन वास्तूप्रमाणे ठेवतानाच दरवाजे, खिडक्यांची दुरुस्ती करून अतिरिक्त बांधकामे हटविण्यात आली आहेत. विद्युत आणि टेलिफोन ताराही सुस्थितीत करण्यात आल्या आहेत. तर स्थानकाला पारंपरिक रंगसंगती देण्यात आली असून सुरुवातीला लाकडी संरचनेत बांधण्यात आलेले स्थानक १८५७ मध्ये पुन्हा नव्याने बांधण्यात आले. आता या स्थानकाचे सुशोभीकरण ब्रिटिशकालिन स्थानकानुसार करण्यात आले आहे. या स्थानकातील तिकीट घर आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयातही सुधारणा करण्यात आली आहे. मुंबई – ठाण्यादरम्यान १८५३ साली लोकल धावली. त्यावेळी भायखळा हे पहिले स्थानक होते.
भायखळा स्थानकाचा कायापालट ; सुशोभीकरण केलेल्या स्थानकातील प्रकल्पांचे उद्घाटन २९ एप्रिलला
मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या ब्रिटिशकाळातील भायखळा स्थानक लवकरच नव्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
![भायखळा स्थानकाचा कायापालट ; सुशोभीकरण केलेल्या स्थानकातील प्रकल्पांचे उद्घाटन २९ एप्रिलला](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/04/mumbai-3-bhaykhala-stn.jpg?w=1024)
First published on: 22-04-2022 at 00:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transformation byculla station inauguration beautified projects april ngo amy