मुंबई : देशभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अलिबागचा आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. अलिबागबरोबर गोराई, मढ या बेटांचाही विकास करण्याचा निर्णय ‘मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हब’अंतर्गत घेण्यात आला आहे. पर्यटनस्थळांच्या विकासाद्वारे आर्थिक विकास साधण्याचे उद्दिष्ट असून, त्याद्वारे पर्यटन क्षेत्रातून मिळणारा महसूल २०३० पर्यंत १५०० कोटी डाॅलरवरून दोन कोटी डाॅलरवर पोहोचेल आणि पर्यटकांची संख्या ५० लाखांवरून थेट दोन कोटींवर जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘एमएमआर ग्रोथ हब’च्या प्रारुप आराखड्यात पर्यटन क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार ‘एमएमआर’मधील सर्वांत महत्त्वाचे आणि देशभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या अलिबागचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास केला जाणार आहे. अलिबागमधील २६०० हेक्टर जागेचा विकास ‘टुरिझम सिटी’ म्हणून केला जाणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’कडून सविस्तर आराखडाही तयार करण्यात येणार आहे.अलिबागबरोबरच मढ आणि गोराई बेटांचाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन आणि पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील ३२०० हेक्टर जागेचा विकास करण्यात येणार आहे. तर कांदळवन क्षेत्रांमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधांचा विकास करून पर्यटकांना आकर्षित केले जाणार आहे.

हेही वाचा – ‘आयडॉल’मध्येही दुहेरी पदवीचे शिक्षण

पंचतारांकित हाॅटेल, रिसाॅर्ट, क्लब

अलिबाग, मढ, गोराई येथे पंचतारांकित हाॅटेल, रिसाॅर्ट, क्लब हाऊस अशा सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच जलवाहतूक अधिकाधिक बळकट करून देशी-परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. समुद्रकिनाऱ्यांचा विकास करण्यात येणार असून जागतिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणांचाही विकास करून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

हेही वाचा – मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण, नवीन वर्षात लोकार्पण, ‘एमएमआरडीए’ची माहिती

आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न

अलिबागमधील किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनालाही ग्रोथ हबच्या आराखड्यात प्राधान्य देण्यात आले आहे. एकूणच ग्रोथ हबमध्ये पर्यटन क्षेत्राला चालना देऊन या क्षेत्राच्या माध्यमातून आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळेच २०२२ मध्ये १५०० कोटी डाॅलर महसूल २०३० मध्ये थेट ५५०० ते ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर २०२२ मध्ये ५० लाख अशी असणारी देशी पर्यटकांची संख्या २०३० मध्ये दोन कोटींवर, तर १५ लाख असलेली विदेशी पर्यटकांची संख्या ५० लाखांवर नेण्याचे लक्ष्य असणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transformation of alibaug gorai madh under growth hub aim to take tourism revenue to 6000 crores in six years mumbai print news ssb