मुंबई : देशात सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असून पुढील तीन वर्षांत महाराष्ट्राचा कायापालट झालेला असेल. ‘हिंदूवहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘समृद्धी’ महामार्गह्ण पुढील दोन महिन्यात शिर्डीपर्यंत पूर्ण होईल आणि डिसेंबर २०२३ पर्यंत हा महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित होईल. विविध प्रकल्पांमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असा विश्वास राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
टीव्ही ९ मराठी आयोजित ‘हित महाराष्ट्राचं : महा – इन्फ्रा’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शाश्वत विकास हेच आपले स्वप्न आहे. रस्ते, उड्डाणपूल बांधताना सर्व संबंधित यंत्रणांशी चर्चा करून झाडे कशी वाचवावीत, जैवविविधता कशी जपावी, यादृष्टीने आपला कायम प्रयत्न असतो, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
करोना साथीच्या काळातही महाराष्ट्रात सुमारे दोन लाख कोटींची गुंतवणूक झाली असून त्यामुळे तीन लाख रोजगार निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांमुळे गुंतवणूकदारांचा ओढा महाराष्ट्राकडे वाढला आहे, असे मत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
सहभागी मान्यवर
यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, ‘एमएसआरडीसी’चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, ‘एमएसआरडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, एमएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल, पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त गोविंद राज, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त सुहास दिवसे, नवी मुंबई पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आणि मीरा भाईंदर पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले आदी मान्यवरांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख या परिषदेत मांडला.
प्रक्षेपण रविवारी.. या परिषदेचा संपादित अंश टीव्ही ९ मराठीवर रविवार, २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे.