मुंबई सत्र न्यायालयाने एका २४ वर्षीय तृतीयपंथीयाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तीन महिन्यांच्या मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर तिचा खून केल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने मंगळवारी (२७ फेब्रुवारी) ही शिक्षा सुनावली. मुंबईच्या कफ परेड भागातील तृतीयपंथीयाने याच परिसरात राहणाऱ्या पालकांकडे मुलीच्या जन्मानंतर साडी-चाळी आणि पैशांची मागणी केली होती. मात्र आर्थिक अडचण असल्यामुळे पालकांनी तृतीयपंथीला पैसे विरोध केला. याचाच राग मनात धरून सदर तृतीयपंथी व्यक्तीने हे अमानूष कृत्य केले. फाशीची शिक्षा सुनावताना सत्र न्यायालयाने या गुन्ह्याची निंदा करत हे रानटीपणाचे लक्षण असल्याचे म्हटले.
पोस्को प्रकरणासाठी असलेल्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश आदिती कदम यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश म्हणाल्या की, अशा निर्घृण गुन्ह्यामुळे चांगल्या सामाजिक वातावरणाला धक्का बसतो. या प्रकरणात २४ वर्षीय आरोपीने जुलै २०२१ रोजी तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण केले आणि त्यानंतर तिचा खून केला. आरोपीने मुलीच्या जन्मानंतर तिच्या पालकांकडे साडी-चोळी आणि १,१०० रुपयांची मागणी केली होती. मात्र कोरोनाची परिस्थिती असून आमची एवढे पैसे देण्याची ऐपत नाही, अशी भूमिका पालकांनी मांडली. त्यानंतर सूडभावनेतून आरोपीने सदर कृत्य केले.
हे कृत्य करून आरोपीला कफ परेड परिसरात स्वतःची दहशत निर्माण करायची होती. जेणेकरून भविष्यात कुणीही त्याला पैसे देण्यास विरोध करणार नाही. तान्ह्या मुलीच्या मृतदेहाची शवविच्छेदन तपासणी केली असता शरीरावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
न्यायाधीश कदम म्हणाल्या की, मुलींची सुरक्षितता ही कोणत्याही समाजासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आरोपीने अतिशय नियोजनपद्धतीने हा गुन्हा केला. तसेच मूलीचा खून केल्यानंतर खाडी किनाऱ्यावर चिमुरडीचा मृतदेह आरोपीने पुरला, जेणेकरून कोणतेही पुरावे राहणार नाहीत. या गुन्ह्यातील क्रूरचा आणि रानटीपणा पाहता हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा असल्याचे सांगून न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.