मुंबई : हेडफोन घालून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सोमवारी (२८ एप्रिल) होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागासाठी असलेला संपर्क क्रमांक (व्हॉट्स अॅप) संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश विभागासाठी खुला केला जाणार आहे.
दुचाकी अथवा चार चाकी वाहन चालविताना हेडफोन घालून चित्रपट, रिल्स, क्रिकेटचे सामने पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाणही अधिक आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर एसटीच्या शिवनेरी बसचा चालक २२ मार्च रोजी क्रिकेटचा सामना पाहण्यात दंग होता. बसमधील एका प्रवाशाने याचे चित्रण करून ते सरनाईक यांना पाठवले होते. त्यावर सरनाईक यांनी एसटी महामंडळाला तात्काळ आदेश देऊन त्या चालकाला निलंबित करण्याचे आदेश दिले. ही बस खासगी कंत्राटदाराची असल्याने त्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
हेडफोन घालून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची नियमावली तयार करण्याचे आदेश देऊन एक महिना उलटला आहे. त्याबाबत काहीही कृती न झाल्याने २८ एप्रिल रोजी होणाऱ्या एसटी महामंडळाच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. वाहनचालकाने हेडफोन घालून वाहन चालविल्यास प्रवाशांनी त्याचे ध्वनिचित्र मुद्रण किंवा छायाचित्र आरटीओ कार्यालयाकडे पाठविल्यास त्या वाहनचालकांवर कारवाई करणे सोपे जाणार आहे.
एक महिन्यापूर्वी याबाबत सूचना दिल्या गेल्या होत्या. पण अद्याप कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात सोमवारी होणाऱ्या एसटी महामंडळाच्या बैठकीत मी जाब विचारणार आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. – प्रताप सरनाईक, मंत्री, परिवहन