मुंबई : राज्यभरात विविध ठिकाणी परिवहन विभागाच्या जमिनी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून या जमिनी अतिक्रमण मुक्त करून, परिवहन विभागाच्या ताब्यात घ्याव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयात परिवहन विभागाची आढावा बैठक नुकताच पार पडली. यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सरनाईक म्हणाले की, परिवहन विभागाच्या बहुतेक जमिनींवर अतिक्रमण झाले आहे.

तेथील अतिक्रमण हटवावे आणि भूखंडाच्या सभोवताली संरक्षक भिंत उभारावी, तसेच तेथे परिवहन विभागाचा नामफलक लावावा. भविष्यात तेथे अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना सरनाईक यांनी परिवहन विभागाला केली. या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे, अकार्यकारी पदाची निर्मिती करणे, वायु वेग पथकाचा दैनंदिन अहवाल मागवून घेणे, मोटार वाहन अधिकाऱ्यांच्या पदनामासह कर्तव्य व जबाबदारी निश्चित करणे, विधि व सल्लागार पदाची निर्मिती करणे, महसूल वाढवणे अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवा

मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोबर २०२३ रोजी घेतला. मात्र, एका वर्षातच परिवहन अधिकारी आपले ‘वजन’ वापरून मलईदार ठिकाणी बदल्या करून घेण्यासाठी विनंती अर्ज करत असल्याचे समोर आले. आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी लोकप्रतिनिधींच्या शिफारसी परिवहन विभागाकडे येत होत्या. याबाबत परिवहन विभागाच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवा, अशी सूचना प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर बदल्यांची कार्यवाही पारदर्शकपणे करण्यासाठी संगणकीकृत प्रणाली विकसित केली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ ऑक्टोबर २०२३ ला मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्याच्या पद्धतीचा प्रारंभ केला. मात्र गेल्या काही कालावधीत ऑनलाइन बदल्याऐवजी या प्रणालीला बगल देत विनंती अर्जाद्वारे बदली सत्र सुरू झाले.

परिवहन विभागातील अनेक मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक आमदार, खासदार यांच्याशी संपर्क साधून बदल्या विनंती अर्ज करीत असल्याचे समोर आले. दरम्यान, परिवहन विभागाच्या विविध पदांच्या बदल्या २०२३ पासून या ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. यामध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणती संधी नाही. त्यामुळे यापुढे या ॲपमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून बदल्या अत्यंत पारदर्शक पद्धतीने होतील याबाबत दक्ष रहावे. तसेच अधिकाऱ्यांच्या बरोबरच लिपिक पदाच्या बदल्याही या ॲपद्वारे होतील, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.