मुंबई: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामधील एसटी बसमध्ये मंगळवारी एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकप्रमुख व आगार व्यवस्थापकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशी करण्याचे तसेच दोषी आढळल्यास तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव यांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी उद्या, गुरुवारी एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्वारगेट महिला अत्याचार प्रकरणात बसस्थानक प्रमुख व आगार व्यवस्थापकांच्या विभागीय चौकशीबरोबरच या स्थानकात कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षा रक्षकांची तात्काळ बदली करून त्यांच्या जागी दुसरे सुरक्षा रक्षक नेमावेत, अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील ७ दिवसांत सादर करण्यात यावा, असे सरनाईक यांनी सांगितले. राज्यातील बसस्थानक परिसरातील निर्लेखित (भंगार) केलेल्या जुन्या बसेसची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. कारण या बसेसकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या एक प्रकारे अवैध धंद्याचे अड्डे बनल्या आहेत. भविष्यात कोणत्याही बसस्थानक परिसरात अशा प्रकारच्या बसेस उभ्या करण्यात येऊ नयेत, असे निर्देशही सरनाईक यांनी दिले.

विरोधकांची टीका, सरकारची कोंडी

घटनेनंतर शिवसेना (ठाकरे) आणि महिला मोर्चाकडून स्वारगेट बस स्थानकात आंदोलन करत सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड करण्यात आली. राज्य संघटक वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली. शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी, असे आमदार रोहित पवार म्हणाले. या प्रकरणाच्या निमित्ताने राज्यातील बस स्थानकांमधील भयानक स्थिती सर्वांसमोर आली आहे, अशी टीका काँग्रेसचे रोहन सुरवसे-पाटील यांनी केली.

पुणे शहर गुन्हेगारांचे ‘आगार’!

● बस आगारातील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेवरून शिवसेना (ठाकरे) पक्षाने आंदोलन करत सुरक्षा कक्षाची तोडफोड केली. पुणे शहर गुन्हेगारांचे ‘आगार’ झाले असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली.

● विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेनंतर अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यानुसार रेल्वे पोलीस, परिवहन पोलीस आणि शहर पोलिसांना सूचना केल्या. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यानुसार आरोपीला लवकरच अटक होईल, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

● पीडित मुलीचे समुपदेशन, तसेच जलद तपासासाठी पोलिसांना सूचना केली आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली असून, आरोपीला लवकरच अटक होईल. सार्वजनिक जीवनात वावरताना तरुणी, महिलांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.

स्वारगेट एसटी स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. घटनेतील आरोपीला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. स्वारगेट स्थानकात यापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यात अजून सुधारणा करण्यात येईल.- माधुरी मिसाळ, परिवहन राज्यमंत्री