मुंबई : ओला, उबेर, रॅपिडोसारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे सूतोवाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, वाहतूक समस्या यासंदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच शासकीय नियमनात आणण्यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूर दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले की, खासगी प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांसंदर्भात केंद्र सरकारच्या धोरणाचा विचार करून, या कंपन्याना एकाच परिवहन नियमांतर्गत एकत्रित आणणे गरजेचे आहे. प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे. सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांअतर्गत चारचाकी, दुचाकी, टॅक्सी यांचा समावेश करण्यात येईल. दुचाकी चालविण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावे, जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी प्राधान्य द्यावे. तसेच त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कंपन्यांनी उपाययोजना कराव्यात अशाही सूचना सरनाईक यांनी केल्या.

हेही वाचा…मुदत ठेवी आणि देणी याविषयी मुंबई महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मागणी

खासगी वाहतूक व्यवस्था, सुस्थितीत असलेली वाहने, प्रवाशांची सुरक्षा, हेल्मेट, महिला चालकांची सुरक्षा या बाबींचा वाहतूक धोरणात समावेश करण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनराव यांनी केले.

एसटीच्या जागेवर रूग्णालय उभारणार

राज्यातील अनेक बस स्थानके ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्यात येत आहेत. एसटीच्या या प्रकल्पात प्रत्येक जिल्ह्यात २५, तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर १०० खाटांचे रूग्णालय एसटी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. या रूग्णालयात एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येतील, तसेच पाच लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्य शासन करेल, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

हेही वाचा…आयआयटी मुंबईचा ‘ई-मोबिलिटी’अंतर्गत ई-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू

सध्या राज्यभरात विविध ठिकाणी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर एसटीच्या जागांचा विकास केला जात आहे. भविष्यात या रुग्णालयांमध्ये एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना रोकडविरहित वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येतील. जेणेकरून त्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या खासगी रुग्णालयात जावे लागणार नाही. पुणे, कोल्हापूर, पुसद, वाशीम येथे रूग्णालय उभारण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळी करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transport minister pratap sarnaik said private passenger transport providers like ola uber rapido brought under one regulation mumbai print news sud 02