मुंबई : भविष्यात राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस स्थानकांचे बांधकाम करताना ती सुंदर आणि सुशोभित असावीत याची काळजी घ्यावी. त्यासाठी महाराष्ट्रातील वास्तुविशारदांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. एसटीच्या मोकळ्या जागेवर होत असलेल्या प्रकल्पामध्ये त्यांनी सुंदर आणि कल्पक कौशल्यातून पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचे ‘रोल मॉडेल’ तयार करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
‘इंडियन असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट’च्या माध्यमातून ठाणे येथे भरवलेल्या दोन दिवसांच्या संमेलनाचे उद्घाटन करताना परिवहन मंत्री म्हणाले की, विखुरलेल्या एसटीच्या सुमारे ३ हजार एकर जमिनीचा विकास करण्यासाठी सर्व समावेश आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यामध्ये वास्तुविशारद म्हणून सूचना आणि प्रस्ताव दिल्यास तो आराखडा अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार करणे शक्य होईल. भविष्यात एसटीची सर्व बस स्थानके, आगारे वास्तुविशारदाच्या सौंदर्यदृष्टीने विकसित झालेली असतील.
एसटीच्या जमिनीवर उभा राहणाऱ्या प्रकल्पामध्ये कौशल्यपूर्ण योगदानातून निर्माण झालेल्या वास्तू येणाऱ्या पिढीला प्रेरक ठरतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार संजय केळकर व जितेंद्र आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास अवचट, महाराष्ट्र आर्किटेक असोसिएशनचे पदाधिकारी, विविध आर्किटेक्ट महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.