मोटार वाहन कायदा-१९८८ रद्द करून त्या जागी रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयक केंद्र आणणार आहे. यामुळे एस.टी., बेस्ट बस आदी सार्वजनिक वाहतूक उपक्रम तसेच रिक्षा व टॅक्सी व्यवसायाचे खासगीकरण होणार आहे. तसेच यातील जाचक तरतुदींमुळे सर्वसामान्य नागरिकही भरडला जाणार आहे. त्याविरोधात उद्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.
रिक्षा, टॅक्सी, एस.टी, बेस्ट बस बंद राहणार असल्याची माहिती ‘नॅशनल फेडेरशन ऑफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स आणि महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार, अधिकारी, स्वयंरोजगारी चालक-मालक संघटना फेडरेशन’चे निमंत्रक अॅड. उदयकुमार आंबोणकर यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, बुधवारी बेस्टच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनूसार बेस्ट या संपात सहभागी होणार नाही. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही महासंचालकांकडून देण्यात आला आहे.
कोणताही नवीन कायदा आणायचा असेल तर त्याविषयी हरकती, सूचना मागविल्या जातात. त्यावर चर्चा होते. मात्र हा प्रस्तावित कायदा फक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे सांगून आंबोणकर म्हणाले, बंदमध्ये भारतीय मजदूर संघासह हिंद मजदूर सभा, इंटक, सीटू, आयटक, कामगार आघाडी तसेच देशभरातील कामगार संघटना सहभागी होणार आहेत. ‘मनसे’ने या बंद आंदोलनाला पाठिंबा दिला असून शिवसेनेच्या सर्व परिवहन कामगार संघटनांनी यात सहभागी व्हावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
संपूर्ण देशभरातील वाहतूक व परिवहन क्षेत्रातील ४० लाख कामगार या बंदमध्ये सहभागी होणार असून महाराष्ट्रातील एक लाख एसटी कर्मचारी, ५ लाख रिक्षाचालक, तसेच ‘बेस्ट’कर्मचारी असे सुमारे ७ लाख कामगार-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा