मुंबई: मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरील स्वयंचलित भाडे संकलन द्वारांचे (ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन गेट) अखेर अत्याधुनिकरण केले आहे. त्यामुळे आता मेट्रो १ मार्गिकेवर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुंबई १ कार्डनेही प्रवास करता येणार आहे. एकूणच एका कार्डवर तिन्ही मेट्रो मार्गिकांवर प्रवास करता येणार आहे. त्यामुळे मुंबई १ कार्डधारकांना दिलासा मिळणार आहे.
मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेवरील प्रवासासाठी एमएमआरडीएने एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत मुंबई १ कार्ड ११ महिन्यांपूर्वी सेवेत आणले आहे. या कार्डला प्रवाशांचा चागला प्रतिसाद मिळत आहे. १,६८,३२४ कार्डांची विक्री झाली आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांवर चालणारे हे कार्ड मेट्रो १ वर मात्र चालत नव्हते. पण आता मात्र मुंबई १ कार्डद्वारे मेट्रो १ वरूनही प्रवास करता येणार आहे. आता एमएमओपीएलने मेट्रो १ मार्गिकेवरील स्वयंचलित भाडे संकलन द्वारांचे (ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन गेट) अत्याधुनिकरण केले आहे. त्यामुळे एमएमओपीएलच्या कार्डसह मुंबई १ ने तिन्ही मेट्रो मार्गिकेवर प्रवास करता येणार आहे. तर एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत विविध बँकांकडून जारी करण्यात आलेले कार्डडी आता ही नव्या स्वयंचलित भाडे संकलन द्वाराद्वारे स्वीकारले जाणार आहे. कोणत्याही कार्डावरून आता प्रवास करता येणार आहे.
मेट्रो १ मार्गिकेवर जाण्यासाठी १२५ तर येण्यासाठी १२२ स्वयंचलित भाडे संकलन द्वार आहेत. यातील येण्यासाठी २७ आणि जाण्यासाठी २७ स्वयंचलित भाडे संकलन द्वार हे एकट्या घाटकोपर मेट्रो स्थानकात आहेत. त्यापाठोपाठ अंधेरी मेट्रो स्थानकात जाण्यासाठी १६ आणि बाहेर येण्यासाठी २० स्वयंचलित भाडे संकलन द्वार आहेत. या सर्व स्वयंचलित भाडे संकलन द्वारांचे अत्याधुनिकरण करण्यात आले आहे. एकूणच आता तिन्ही मेट्रो मार्गिकांवरील प्रवास सुकर होणार आहे.