दादर, कुर्ला, अंधेरी पाठोपाठ सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या बोरीवलीत सध्या प्रवाशांचा कुणीच वाली नसल्यासारखी अवस्था आहे. इथले सात आणि आठ नंबरचे फलाट म्हणजे बोरीवलीकरांच्या सहनशक्तीचा कडेलोट आहेत. या दोन फलाटांची इतकी दहशत आहे की, या फलाटावर जर गाडय़ा जाणार असल्याची घोषणा झाली तर प्रवासी कांदिवली, मालाडलाच उतरून मागील गाडीने येणे पसंत करतात.
प्रवाशांच्या तक्रारींमुळे या दोन स्थानकांवर गाडी येणार असेल तर त्याची सूचना मालाडपासूनच प्रवाशांना देण्यात येते. पण, त्याने प्रवासाच्या वेळेची बचत होते का तर त्याचे उत्तर नाहीच असे आहे. चालकाकडून या सूचनेचे भोंगे वाजू लागले की गोराई, चारकोप, वझिरा, एसी कॉलनी, एक्सर या भागात राहणारे बोरीवलीचे बहुतेक प्रवासी कांदिवलीलाच पटापट उडय़ा टाकून उतरतात.
राजेंद्र नगर, शिंपोली येथे राहणारे प्रवासी वगळता या प्लॅटफॉर्मवर येणारी बोरीवली गाडी बहुतेककरून रिकामी झालेली असते.
कारण, आठ किंवा सात फलाटावरून आपला बसस्टॉप किंवा शेअर रिक्षाचे ठिकाण गाठणे बोरिवलीकरांना इतके त्रासदायक होते की ते कांदिवलीलाच उतरून मागील गाडीने येणे पसंत करतात. एकवेळ दोन, तीन किंवा सहा फलाटावरील रेल्वेचा पूल चढून आलेले परवडले पण सात-आठ नंबरचा फलाट नको अशीच बहुतांश प्रवाशांची मानसिकता आहे.
आठ नंबरच्या शेवटच्या (कांदिवलीच्या बाजूच्या) डब्यापासून विरारच्या बाजूची शेवटची तिकीट खिडकी गाठण्यासाठी बरोबर १५ मिनिटे लागतात. पंधरा मिनिटात स्टेशनवरून माणूस रिक्षा किंवा बस पकडून गोराईला पोहोचू शकतो. त्यामुळे, या फलाटावरून निघणाऱ्या गाडय़ाही कांदिवलीपर्यंत बहुतेककरून रिकाम्याच जातात. कारण एक नंबरवरून हे फलाट गाठायलाच इतका वेळ लागतो की त्या आधी रेल्वे तिची वेळ झाल्याने निघून गेलेली असते. आठ नंबरच्या फलाटाबाहेर सहजासहजी रिक्षाही मिळत नाही. फलाटाबाहेरील एकमेव बस थांब्यावरूनचारकोप, गोराई, आयसी कॉलनी, दहिसर पूल येथे जाणाऱ्या बस आहेत. पण, त्यांची उपलब्धता इतकी कमी आहे की बहुकेतदा प्रवासी १० ते १५ मिनिटे चालत पुढील बसथांब्यावर जाणे पसंत करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा