राज्यातील खासगी रुग्णालयांना दर्शनी भागात वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनात तसा कायदा करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.
राज्यात वैद्यकीय सेवाशुल्कात सुसूत्रता आणण्यासाठी खासगी डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयांच्या दर्शनी भागात दरपत्रक लावण्याची सक्ती करण्यात आल्याबाबतचा प्रश्न रमेश शेंडगे, प्रकाश बिनसाळे, हेमंत टकले, आदी सदस्यांनी विचारला होता. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यास जाणाऱ्या रुग्णांना नेमका किची खर्च येणार आहे, याची कल्पना नसते. त्याची माहिती त्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णालयांच्याबाहेर दरपत्रक लावण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी या सदस्यांनी केली.
आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी त्यासंदर्भात सांगितले की, खासगी रुग्णालयांना वैद्यकीय उपचारांचे दरपत्रक लावण्याची सक्ती करण्यात आलेली नाही. परंतु रुग्णांच्या हितासाठी तशी व्यवस्था करणे बंधनकारक करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर पुढील अधिवेशनात खासगी रुग्णालयांनी वेगेवळ्या वैद्यकीय उपचारांचा खर्च किती येणार आहे, याची माहिती रुग्णांना मिळावी, याकरिता तसे दरपत्रक लावणे बंधनकारक करणारा कायदा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा