मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा घेणाऱ्या लाभार्थींची संख्या ७५ लाखांहून अधिक झाली आहे. दिवसेंदिवस वैद्यकीय सुविधांमध्ये पडणारी भर पाहता या दवाखान्यांना मिळणारा प्रतिसाद देखील वाढतो आहे. तसेच नागरिकांच्या सोयीच्या वेळेत आणि घराजवळ दवाखाने उपलब्ध असल्याने अधिकाधिक संख्येने मुंबईकर या वैद्यकीय सुविधांचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत २४३ आपला दवाखाना कार्यान्वित आहेत. तर, नजीकच्या काळात आणखी ३७ दवाखाने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर दिवसागणिक या दवाखान्यांच्या संख्येत भर पडत गेली. एवढेच नव्हे तर या दवाखान्यांमधून लक्षावधी मुंबईकरांना चांगली वैद्यकीय सेवा मिळते आहे.

हेही वाचा – अधिसभेमुळे सरकारची शोभा, निवडणूक स्थगितीबद्दल न्यायालयाची चपराक; मंगळवारी मतदान

मुंबईकरांना आपल्या परिसरातच, घरानजीकच वैद्यकीय सुविधा मिळण्याच्या उद्दिष्टाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची संख्या अधिकाधिक वाढवून, नियोजित वेळेत करून वैद्यकीय सेवा देण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. मुंबईकरांना दोन सत्रांमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतानाच गुणवत्तापूर्ण सेवा तसेच पुरेशी औषधी नियमितपणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत. त्या दृष्टीने देखील नियोजन केले जात आहे.

या संदर्भात माहिती देताना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, लोकार्पण दिवसापासून आजपर्यंतचा विचार करता, आपला दवाखान्याच्या माध्यमातून लाभ घेतलेल्या नागरिकांची संख्या आता ७५ लाखांहून अधिक झाली आहे.

सद्यस्थितीला आपला दवाखान्यांची एकूण संख्या २४३ इतकी आहे. तर आगामी काळात आणखी ३७ दवाखान्यांची भर पडणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या आपला दवाखान्यांपैकी, पोर्टाकेबिन्समध्ये ८५, सुसज्ज इमारतीत १७, नियमित दवाखाने १०८ आणि पॉलिक्लिनिक्स ३३ याप्रमाणे दवाखाने कार्यरत आहेत. आरोग्य सुविधांची पुर्तता करण्याच्या अनुषंगाने झोपडीबहुल भागातील प्रत्येक २५ हजार लोकसंख्येसाठी एक दवाखाना तर अडीच लाख लोकसंख्येसाठी एक पॉलिक्लिनिक अशा पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यात येते, असेही डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.

हेही वाचा – कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलच्या विकासासाठी मुंबई विद्यापीठाची अनोखी झेप! आजारांचे आगाऊ निदान होणार…

दोन सत्रांमध्ये दवाखान्याची सेवा रुग्णांसाठी उपलब्ध आहे. मोफत सल्ला, आजाराचे निदान आणि उपचार अशा त्रिसूत्रीवर आधारित या दवाखान्यांमध्ये सुविधा देण्यात येते. या दवाखान्यांच्या ठिकाणी सेवा पुरविण्यासाठी १ हजार १४० कर्मचारी कार्यरत आहेत. या दवाखान्यांमध्ये खासगी डायग्नोस्टिक केंद्राद्वारे महानगरपालिका दरात एक्स रे, सोनोग्राफी, ईसीजी, सिटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी सुविधा तसेच पॉलीक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दंतचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय चिकित्सक, त्वचारोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट अशा विविध तज्ज्ञांमार्फत मोफत सल्ला व उपचार केले जातात.