एक कोटी खर्चातून सहा महिन्यांत उभारणी
मुंबई : उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निधीतून वांद्रे येथील समुद्रकिनारी संपूर्णपणे लाकडात तयार केलेले ‘वृक्ष घर’ (ट्री हाऊस) उभारण्यात येणार असून त्याकरिता एक कोटी रुपये खर्च येणार आहे. मुंबईतील हॅंगिंग गार्डनमधील म्हातारीच्या बुटासारखे आणखी एक पर्यटनस्थळ लवकरच उपनगरातही उपलब्ध होणार आहे. सहा महिन्यांत हे ‘वृक्ष घर’ उभारण्यात येणार आहे.
पालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे विकासकामांच्या भूमिपूजनाचा व लोकार्पणाचा मुहूर्त सत्ताधारी पक्षातर्फे साधला जात आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही अनेक विकासकामे उपनगरात करण्यात येणार आहेत. त्याबाबतचे प्रस्तावही नियोजन विभागामार्फत स्थायी समितीकडे पाठवले जात आहेत. आतापर्यंत बसस्थानकांचा विकास, मोठे चौक आणि उड्डाण पुलाखालील जागांचे सौंदर्यीकरण अशा कामांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत. आता वांद्रे येथील ‘वृक्ष घरा’चा प्रस्तावही स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.
वांद्रे किल्ल्याजवळील उद्यानाच्या भूखंडावर हे अनोखे ‘वृक्ष घर’ उभे राहणार आहे. सुमारे ५०० चौरस मीटर जागेवर एक कोटी रुपये अंदाजित खर्चातून हे ‘वृक्ष घर’ बांधण्यात येणार आहे. हे ‘वृक्ष घर’ उभारण्यासाठी पालिकेने स्वारस्यपत्रे मागवली होती. त्यातून तीन निविदाकार पुढे आले होते. त्यापैकी एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हे ‘वृक्ष घर’ उभारण्यासाठी माती विश्लेषणे, जमिनीचे मूल्यांकन, जमिनीच्या स्थितीची तपासणी, वृक्षघर बांधण्यासाठी वृक्ष अनुकूल आहेत की नाही याबाबत संशोधन करणे, जमिनीचे सर्वेक्षण करणे, ‘वृक्ष घरा’चा आराखडा तयार करणे ही कामे कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे.
दर सहा महिन्यांनी संरचना तपासणी
बांधकामाचा हमी कालावधी संपेपर्यंत दर सहा महिन्यांनी ‘वृक्ष घरा’चा संरचनात्मक तपासणी अहवाल नियोजन विभागाकडे सादर करावा लागणार आहे. नियमित तपासणी, देखरेख व आवश्यकतेनुसार तांत्रिक तज्ज्ञांची नेमणूकही करावी लागणार आहे.