मुंबईतील झाडे सिमेंट, डांबर, पेव्हिंग ब्लॉकने जखडलेली
वाढत्या नागरीकरणाची ओळख ठरलेले सिमेंटचे व डांबराचे चमकदार रस्ते, पदपथावरचे पेव्हिंग ब्लॉक आता शहरातील प्राणवायू देणाऱ्या वृक्षांच्याच मुळावर उठलेले दिसत आहेत. रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या पदपथांवरील झाडांभोवती आळे न करता ठेकेदारांकडून थेट पेव्हिंग ब्लॉकने, डांबराने झाडे जखडण्यात आली आहेत. वाढीस वाव न मिळाल्याने या झाडांची मुळे कमकुवत होऊन पावसाळयात हीच झाडे पडत असून त्यांवर जगणाऱ्या शहरातील पक्ष्यांचे जीवनही धोक्यात आल्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली.
मुंबईतील सध्याचे नागरीकरण व त्यामुळे नागरी सोयींसाठी होत असलेली विकासकामे आता पर्यावरणाचाच घास घेऊ लागली आहेत. मुंबईत रस्त्यांच्या कडेला अनेक वृक्ष असून त्यांना या विकासकामांचा फटका बसतो आहे. कारण, महापालिकेमार्फत रस्ते रुंदीकरण, पदपथ निर्मिती करताना या कामांचे ठेकेदार सर्रासपणे या पदपथावर असणाऱ्या झाडांभोवती नियमाप्रमाणे एक मीटर आळे ठेवणे आवश्यक असताना ते ठेवताना दिसत नाहीत. त्यामुळे संपूर्ण झाड व त्याची मुळे ही सिमेंट, डांबर अथवा पेव्हिंग ब्लॉकमध्ये जखडली जातात. यामुळे मुळांची खोल जमिनीत जाण्याची प्रक्रिया थांबते आणि झाड कमकुवत होते. परिणामस्वरूपी पावसाळ्यात हीच कमकुवत झाडे कोसळतात असे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुलुंड, शिवाजी पार्क, बोरिवली व मुंबईतील अनेक उपनगरांत अशी पेव्हिंग ब्लॉकमध्ये जखडलेली झाडे दृष्टीस पडत आहेत.
हरित लवादाचे आदेश पायदळी
राष्ट्रीय हरित लवादाने २८ जुलै २०१५ ला दिलेल्या आदेशाप्रमाणे अशा वृक्षांना वाचविण्याची जबाबदारी महापालिकांची आहे. मात्र सध्या मुंबईत अशी झाडे आढळल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक परदेशी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, असे प्रकार पूर्वी होत होते. मात्र सध्या अशी कोणतीही झाडे नसून काम करताना नियमाप्रमाणे झाडांभोवती जागा सोडण्यात येत आहे.
पक्षी धोक्यात..
शहरातील या झाडांवर पोपट, मैना, हळद्या, कोकिळा, बुलबुल, चिमणी, कोतवाल आदी पक्षी राहतात. मात्र या झाडांचा मृत्यू झाल्यास या पक्ष्यांचेही अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईतील अनेक ठिकाणी झाडे व त्यांच्या मुळांना काँक्रीट व ब्लॉकने जखडून टाकले आहे. या झाडांना वाचविण्याची जबाबदारी ही हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेच्या संबंधित विभागाची आहे. शहरात अशा झाडांचा जीव वाचविण्यासाठी आम्ही ‘मला जगू द्या’ या वृक्ष बचाव मोहिमेला सुरुवात केली असून यात ३५ झाडे मोकळी केली.
– अभिजीत चव्हाण, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य, मुंबई महानगरपालिका
आपल्याकडे नागरी वस्तीत जी काही झाडे शिल्लक आहेत ती टिकवणे आवश्यक आहे. एकीकडे पुनर्विकास, उड्डाणपूल, नवी बांधकामे यात झाडे तुटतात. त्यामुळे उरलेली झाडे जगवणे आवश्यक आहे. झाडांभोवती किमान दोन फूट माती ठेवल्यास ही झाडे वाचतील.
– अतुल साठे, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे सदस्य