लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्यांची सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणी करण्यात येत आहे. पालिकेच्या उद्यान विभागातर्फे मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांलगतची ५२ ठिकाणच्या एकूण २ हजार ४२४ झाडांची छाटणी करण्यात येणार आहे. यातील ५० टक्क्यांहून अधिक झाडांची छाटणी पूर्ण झाली असून उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.

पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दरवर्षी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना करीत असते. यंदाही पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन वेगाने कामे करीत आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गालगतच्या झाडांची सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणी करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणांना दिले होते. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनी, उप आयुक्त किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे रुळांलगत धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांची छाटणी करण्यात येत आहे.

आणखी वाचा-कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांकडे सरकारचा कानाडोळा, अवेकन इंडिया मूवमेंट का आरोप

तसेच, संबंधित रेल्वे मार्गालगत असलेल्या २ हजार ४२४ झाडांच्या छाटणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यापैकी पश्चिम रेल्वेमार्गालगतची ३४, मध्ये रेल्वेमार्गालगतची १६ आणि हार्बर रेल्वे मार्गालगतची २ अशा एकूण ५२ ठिकाणच्या झाडांच्या छाटणीसाठी उद्यान विभागाने परवानगी दिली आहे. या ५२ ठिकाणच्या एकूण २ हजार ४२४ झाडांपैकी निम्म्याहून अधिक झाडांची छाटणी झाली आहे. उद्यान विभाग सध्या घाटकोपर, विद्याविहार, वडाळा आदी परिसरातील रेल्वेमार्गालगतच्या झाडांची छाटणी करीत आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याच्या कडेची, तसेच सार्वजनिक ठिकाणच्या झाडांची छाटणी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून केली जाते. गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय – निमशासकीय संस्था, खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करायची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

आणखी वाचा-शिष्यवृत्तीचा तपशील सादर न करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांवर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने उचलली कठोर पावले

मुंबईतील ३८ हजार ५७४ झाडांची छाटणी पूर्ण, ७ हजार ३४ आस्थापनांना नोटीस जारी

मुंबईत आतापर्यंत ३८ हजार ५७४ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. तर, खासगी तसेच शासकीय मालकीच्या परिसरामधील झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासंदर्भात ७ हजार ३४ आस्थापनांवर नोटीस बजावण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. एकूण झाडांपैकी १ लाख ८६ हजार २४६ झाडे रस्त्यांच्या कडेला आहेत. त्यापैकी १ लाख १४ हजार ३३७ हजार झाडांची छाटणी अपेक्षित असून ३ मेपर्यंत ३८ हजार ५७४ झाडांची छाटणी झाली आहे. येत्या ७ जूनपर्यंत उर्वरित झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे. तसेच, मृत आणि कीड लागलेली आणि वाकलेली ५०२ झाडे सर्वेक्षणादरम्यान आढळली असून यातील ४८२ झाडे काढून टाकण्यात आली आहेत, अशी माहिती परदेशी यांनी दिली.

Story img Loader