डी. एन. नगर – मंडाले ‘मेट्रो २ ब’च्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीतील नानावटी रुग्णालय ते वांद्रे दरम्यानच्या २४ झाडे कापण्यात येणार आहे. यासाठीचे मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने जाहीर निवेदन प्रसिद्ध केली आहे. नानावटी रुग्णालय ते वांद्रे दरम्यानची झाडे कापली जाणार असून याबाबत नागरिकांच्या सूचना-हरकती मागविण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>>विश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का? मुंबईची हवा इतकी का खालवली?
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो २ ब चे काम सुरू आहे. या कामासाठी नानावटी रुग्णालय ते वांद्रे दरम्यानची २४ झाडे कापावी लागणार आहेत. एमएमआरडीएने यासाठी वृक्ष प्राधिकरणकडे परवानगी मागितली आहे. एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार ही झाडे कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाने नुकतेच एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनद्वारे नागरिकांकडून सूचना-हरकती मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांना १६ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन सूचना-हरकती नोंदविता येणार आहेत. दरम्यान मुंबईतील पर्यावरण प्रेमींकडून मोठ्या संख्येने यावर सूचना-हरकती नोंदविल्या जाण्याची शक्यता आहे.