मुंबई : कठीण पायवाट, प्रस्तरारोहण आणि उंचावरून दिसणारे अद्भुत निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी उत्साहाने इरशाळगडाची वाट धरणाऱ्या गिर्यारोहकांना बुधवारी मध्यरात्री दु:खद अंतकरणाने गडाच्या दिशेने धाव घ्यावी लागली. इरशाळवाडीवर डोंगर कोसळल्याचे समजताच काळय़ाकुट्ट काळोखात गिर्यारोहकांचे चमू ग्रामस्थांच्या मदतीसाठी धावले. शासकीय आपत्ती यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्याच्या आधी या गिर्यारोहकांनी केलेल्या बचावकार्यामुळे अनेकांचे जीव वाचले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती रायगड जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र माउंटेनिअर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरला (एमएमआरसी) रात्री एकच्या सुमारास कळवली. एमएमआरसीशी संलग्न असलेल्या खोपोलीच्या यशवंती हायकर्सचे गिर्यारोहक बचावकार्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे घेऊन सर्वप्रथम रात्री दीड वाजताच्या सुमारास इरशाळवाडीजवळ पोहोचले आणि बचावकार्याला सुरुवात झाली. काही जणांकडे स्वत:चे वाहन होते, तर काहींकडे नव्हते. मात्र वाहतुकीच्या समस्येतून मार्ग काढत सर्वजण बचावकार्यासाठी एकवटले.  अंधारात मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढणे आणि जखमींचा शोध घेणे आव्हानात्मक होते. शोधकार्य सुरू असताना पायाखाली कोणीही येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जात होती.

एमएमआरसीशी संलग्न असलेल्या यशवंत हायकर्स – खोपोली, निसर्ग मित्र – पनवेल, बदलापूरवरून अजिंक्य हायकर्स, शिवदुर्ग मित्र – लोणावळा आदी गिर्यारोहकांच्या विविध संघटना पोहोचल्या होत्या. पहाटेच्या वेळेस एनडीआरएफचे जवान दुर्घटनास्थळी पोहोचले. उजाडल्यानंतर एनडीआरएफचे शिस्तबद्ध काम सुरू झाले.

उरलेल्या भागाचा धोका इरशाळगडाकडे तोंड करून उभे राहिल्यावर वाडीच्या मागील डोंगराच्या उजवीकडील साधारणत: १०० फूट उंच व २०० फूट रुंद मातीच्या चढावाचे भूस्खलन झाले. शाळेच्या डावीकडील व उजवीकडील काही घरे जमीनदोस्त झाली आहेत. अतिवृष्टीमुळे डोंगराचा काही भाग डोंगरापासून वेगळा झाला आहे. जर अतिवृष्टी अशीच होत राहिली तर तो भागसुद्धा खाली येऊ शकतो.  त्यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत ‘एमएमआरसी’च्या स्वयंसेवकांनी व्यक्त केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trekkers rush for help in irshalgad village after landslide zws