लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : सतत डोकेदुखी व उलट्या होत असल्यामुळे त्रस्त असलेल्या महिलेवर मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात ‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तिचे प्राण वाचविले. मुंबईमध्ये मेंदू विकार तज्ज्ञांनी प्रथमच या पद्धतीने दुर्मिळ शस्‍त्रक्रिया केली असून देशातील ही ११ वी शस्त्रक्रिया आहे.

विलेपार्ले येथील मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रूग्‍णालयात डोकेदुखी व उलट्यांमुळे त्रस्त असलेली ५९ वर्षीय महिला दाखल झाली. रुग्णाचे सीटी स्कॅन केल्यानंतर तिच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्‍याचे आढळले. रक्तवाहिन्या स्पष्टपणे दिसाव्यात यासाठी डिजिटल सब्स्ट्रक्शन अँजिओग्राफी या फ्लूरोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यात महिलेच्‍या मेंदूतील रक्त धमनीचा फुगा फुटल्याने रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मेंदू विकार विभागातील (न्युरोलॉजी) डॉक्टरांनी ‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ या उपकरणाच्या सहाय्याने आधुन‍िक पद्धतीने शस्‍त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये रुग्णाच्या रक्‍तामध्‍ये गुठळी होऊ नये म्हणून अस्पिरीन किंवा अन्य औषधे देण्‍याची गरज लागत नाही. अन्य पद्धतीने शस्‍त्रक्रिया केल्‍यास रुग्‍णांना अस्पिरिन हे औषध द्यावे लागते. त्‍यामुळे पुन्‍हा रक्‍तस्‍त्राव होण्‍याची शक्यता असते.

आणखी वाचा-अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड: लैलाच्या सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा

कूपर रूग्‍णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी स्वतः तत्काळ शस्त्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रणा आणि औषधे उपलब्ध करून दिली. डॉ. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. प्रद्युम्न ओक, डॉ. मन‍ीष साळुंखे, डॉ. अबू ताह‍िर यांनी ही शस्‍त्रक्रिया यशस्‍वीपणे पार पाडली. भूलतज्ञ विभागप्रमुख डॉ. अन‍िता शेट्टी, औषधवैद्यक शास्‍त्र विभागप्रमुख डॉ. नीलम रेडकर, सहाय्यक प्राध्‍यापक डॉ. दीप रावळ यांचे सहकार्य लाभले.

‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ उपकरणाच्या सहाय्याने भारतात झालेली ही ११ वी, तर मुंबईतील पहिलीच यशस्वी शस्‍त्रक्रिया आहे. कूपर रुग्णालयातील मज्जा संस्था आणि मेंदू विकार डॉक्टरांच्या पथकाने ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करून महानगरपालिकेच्या नावलौकिकात भर टाकली आहे. महानगरपालिकेच्‍या रूग्‍णालयात आधुनिक व गुंतागंतीच्‍या शस्त्रक्रिया अत्यंत माफक दरात होतात. सामान्‍य मुंबईकरांना त्याचा नेहमीच फायदा होतो. -डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता, कूपर रुग्णालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trenza embolization surgery on a woman with cerebral hemorrhage mumbai print news mrj