गेले दोन आठवडे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टोप्या उडवीत उणीदुणी काढल्याने राज्यभर रंगात आलेल्या प्रचाराच्या तोफा अखेर सोमवारी थंडावल्या. आघाडी आणि युती संपुष्टात आल्याने राज्यात चौरंगी किंवा पंचरंगी लढती होणार असल्याचे चित्र असले तरी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात कमकुवत ठरणारे उमेदवार मतदानापूर्वीच बाद झाले आहेत, त्यामुळे भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांतच प्रमुख लढत होईल व पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना आव्हान राहील, अशी स्थिती आहे.
दोन आठवडय़ांच्या जोशपूर्ण आणि एकमेकांवर आगपाखड करणाऱ्या प्रचारामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या चार प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील रंगत आणि ताण अधिक वाढला आहे. आघाडी वा युती नसल्याने यंदा राजकीय चित्रही वेगळे राहणार आहे. प्रत्येक मतदारसंघात सरासरी १० ते १५ उमेदवार िरगणात असले तरी आघाडी वा युती नसल्याने यंदा दुरंगीऐवजी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आघाडी वा युतीमुळे गेली दोन दशके राज्यात साधारणत: दुरंगी लढती व्हायच्या. यंदा भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या प्रमुख पक्षांसह काही मतदारसंघांत डावी आघाडी, भारिप बहुजन महासंघाचे प्रभावी उमेदवार आहेत. त्यामुळे कागदावर ही निवडणूक पंचरंगी असल्याचे दिसते. मात्र, मतदानाची तारीख जवळ आल्यावर मतदारांनी कोणाला मतदान करायचे याची जवळपास खूणगाठ बांधलेली असते. अशा वेळी मतदारसंघांत कमकुवत ठरणारे उमेदवार आपोआप मतदारांच्या मनातून बाद झाले आहेत. या घडामोडींमुळे अंतिम टप्प्यात तिरंगी लढती अपेक्षित आहेत. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने लढती होण्याची शक्यता आहे. काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी वा मनसेचे उमेदवार स्पर्धेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार लढतीत आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार जेथे सक्षम आहेत, अशा ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार स्पर्धेत राहणार नाहीत. भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार बहुतांशी सर्वच मतदारसंघांमध्ये लढतीत राहण्याची चिन्हे आहेत.

प्रचारकल्लोळ संपला!
* आरोप-प्रत्यारोप, दूषणे, मागण्या, आवाहनांनी भरलेला व गेल्या दोन आठवडय़ांपासून सुरू असलेला प्रचारकल्लोळ सोमवारी अखेरीस संपुष्टात आला.
* प्रचार संपला असला तरी मंगळवारी छुप्या प्रचारावर विविध पक्षांचा भर असेल. सोमवारी अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या पालघर, रत्नागिरी व कणकवली येथे तीन सभा झाल्या.
* उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात- जळगावात- प्रचाराची इतिश्री केली.
* राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत प्रचाराची अखेरची सभा घेतली, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत वार्तालापातून आपली भूमिका मांडली.