मुंबई : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी मुंबईमधील आदिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारला. वनं जमीन, मानवी हक्क आणि शेत जमिनीचे प्रश्न सोडवावे, यासह विविध मागण्यांसाठी गोरेगावमधील आरे वसाहतीच्या परिसरात आदिवासी बचाव यात्रा काढण्यात आली होती. दरम्यान, आदिवासी बचाव यात्रेमुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त निरनिराळे उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा जागतिक दिनाचे औचित्य साधून मुंबईमधील आदिवासींनी ‘आदिवासी बचाव’ यात्रेचे आयोजन केले होते. आरे दुग्ध वसाहत, गोरेगाव चेकनाका येथून सकाळी १० वाजता या यात्रेला सुरुवात झाली. पारंपरिक वेषभूषेत मोठ्या संख्येने आदिवासी यात्रेत सहभागी झाले होते. आरेमधील ५०० हून अधिक आदिवासी या यात्रेत सहभागी झाले होते. नृत्य आणि गीताने आरेचा संपूर्ण परिसर शुक्रवारी गजबजून गेला होता. आदिवासींवर होणारा अन्याय, भेदभाव याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात आली होती. दरम्यान, यंदा पोलिसांनी कार्यक्रमापूर्वी दोन दिवस आधी यात्रेला परवानगी नाकारली. मात्र संघटना यात्रेवर ठाम होते. यानुसार शुक्रवारी सकाळी आदिवासी आणि पर्यावरणप्रेमी यांनी आदिवासी बचाव यात्रा काढली होती.
हेही वाचा…मलनिःसारण वाहिनीत पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा, बोरिवली पोलिसांकडून गुन्हा दाखल
मुंबईतील आदिवासी पाडे अधिकृत गावठाण म्हणून घोषित करावे, भारतीय संविधानाने अभिप्रेत असलेली स्वायत्तता आणि प्रतिनिधित्व आदिवासींना प्रदान करावे, भारतीय संविधानानुसार आदिवासींना मुंबईचे मूळ रहिवासी म्हणून मान्यता द्यावी आणि आतापर्यंत नाकारले जात प्रमाणपत्र जारी करावे या प्रमुख मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली होती.