ठाणे जिल्ह्य़ातील कुपोषणाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आदिवासी बांधवांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी आदिवासी वनजमिनी हक्क कायद्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे करावी, या प्रमुख तसेच अन्य मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने बुधवारी ठाणे शहरात मोर्चा काढून टेंभीनाका परिसरात जाहीर सभा घेतली. दरम्यान, मोर्चेकरांनी ठाणे जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्या वेळी वेलरासू यांनी याप्रकरणी सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या १० तारखेला एक बैठक बोलविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या मोर्चामध्ये सुमारे २० हजार आदिवासी बांधव सहभागी झाल्याने शहरातील मोर्चाच्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तसेच टेंभीनाका परिसरात जाहीर सभा असल्याने त्या ठिकाणी जाणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली होती.
 ठाणे येथील साकेत परिसरात श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते बुधवारी दुपारी मोठय़ा संख्येने जमले होते. त्यानंतर साकेत, कळवा नाका, जिल्हाधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बाजारपेठ, चिंतामणी चौक, टेंभीनाका, या मार्गे मोर्चा काढण्यात आला होता. टेंभीनाका परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.