भाजपचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि मोदी सरकारमधील ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी आज त्यांच्या निकटवर्तीयांनी, असंख्य चाहत्यांनी, पक्ष कार्यकर्त्यांनी आणि राजकीय सहकाऱ्यांनी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकारण्याचा संकल्प सोडला.
दीर्घकाळ रखडलेला अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण व्हावा हे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून या मार्गाच्या प्रगतीची माहिती घेत तो लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना रेल्वे मंत्रालयास दिल्या आणि या मार्गाच्या खर्चातील राज्याचा वाटा उचलण्यावरही महाराष्ट्र सरकारने कालच शिक्कामोर्तब केले.
गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले. राज्य सरकारने त्यांना वाहिलेली ही कृतिशील आदरांजली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. पंकजा, खासदार प्रीतम आणि यशश्री या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तसेच मुंडे परिवारातील सर्वानाच आज त्यांच्या असंख्य आठवणींनी अस्वस्थ केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राच्या आणि आमच्या या आदरणीय नेत्याचे विकासाचे स्वप्न साकार करणे आणि त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने वाटचाल करणे हीच त्यांनी खरी आदरांजली असेल, अशा शब्दांत फडणवीस यांनी मुंडे यांच्याविषयीच्या आदरभावना व्यक्त केल्या.
मुंडे यांच्या स्वप्नातील नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग मार्गी लावण्यासाठी ठाम पावले टाकून केंद्र व राज्य सरकारने मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली आहे, असे फडणवीस म्हणाले. प्रदेश भाजपच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुंडे यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या आठवणींनी अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. मुंबईत ५१ हजार झाडे लावून मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा संकल्प मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी सोडला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस वंदन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा