सुलभा उत्तम अभिनेत्री होतीच. तिच्याबद्दल विशेष गोष्ट सांगायाची म्हणजे तिच्यात प्रचंड दांडगी इच्छाशक्ती होती. ती शेवटपर्यंत काम करत राहिली. शेवटच्या काळात काही दुखणी असतानाही ती चित्रीकरणाला जात असे. प्रत्येक भूमिकेची गरज समजून त्याप्रमाणे प्रभावीपणे काम करणे हे विशेष. दुसरे म्हणजे बालरंभूमीसाठी तिने मोठे काम केले. केवळ स्पर्धेसाठी नाटकं करायची म्हणून तिने केली नाहीत. तर लहान मुलांसाठी उत्तम नाटके करता यावीत यासाठी तिने ती विजय तेंडुलकरांकडून लिहून घेतली हे तिचे योगदान आहे. त्यावेळी आमच्या सगळ्यांचे आपापल्या परीने काम सुरू होते. त्यावेळी विजयाच्या नाटकातले सुलभाचे काम मी पाहिले होते. म्हणजे आधी ‘रंगायन’ आणि त्यानंतर ‘आविष्कार’ या सर्व काळात मी तिचे काम पाहत होतो. त्यामुळे एकमेकांची ओळख तशी होती. त्यानंतर माझ्या एका नाटकातही ती होती, त्याच्या तालमीही झाल्या, पण काही अडचणींमुळे ते नाटक पुढे झाले नाही. अरविंदने माझ्या पुष्कळ व्यावसायिक नाटकात काम केले. त्यामुळे सुलभा आणि त्यांच्या कुटुंबाशी अधिक जिव्हाळ्याचे नाते झाले. त्यानंतर काही मालिकांमध्येही सुलभाने काम केले. ती तालमीलाही येऊन बसे. तिच्या भूमिकेमुळे ती अधिकाधिक मोठी झाली. मात्र तिने कधीच त्याचे स्तोम माजवले नाही. दरम्यान, अरविंदचा मृत्यू झाला पण तिने त्याहीनंतर काम सुरू ठेवले. मध्येच कधी तरी म्हणायची, ‘मला डिमेन्शिया झाला आहे. मला काहीच आठवत नाही.’ मग मी तिला म्हणत असे, ‘मग तुला हे बरे आठवते की डिमेनशिया झालाय ते. तू नाटकातल्या ओळी कधीच कशी विसरत नाहीस. मला माहिती आहे, तू हे गंमतीने म्हणतेस.’ प्रचंड इच्छाशक्ती आणि कामाची शिस्त तिने शेवटपर्यंत पाळली. तिचे काम हे काळाच्या पुढे जाणारे होते.
रत्नाकर मतकरी, लेखक
चित्रपट, राजकीय क्षेत्रातही शोक
अभिनयाचे धडे दिले : आम्ही त्यांना सुलु मावशी म्हणूनच हाक मारायचो. ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक करताना अनेक वेळा त्यांचे सहकार्य लाभले होते. तसेच त्यांच्याकडून मला अभिनयाचे धडे शिकायला मिळाले. माझे पती दीपक बलराज विज यांच्या ‘जान तेरे नाम’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. त्यांच्या निधनाने आपण एक थोर व्यक्तिमत्व गमावले आहे.
किशोरी शहाणे, अभिनेत्री
आई गेली.. : त्यांच्यासोबत काम करताना रंगमंचावर आई वावरत असल्याचे वाटायचे. त्यांच्या अभिनयातून खूप काही शिकायला मिळत होते. त्यांनी जाहिरातीपासून चित्रपटापर्यंत अशा प्रत्येक क्षेत्रात काम केले आहे. काही दिवसांपासून त्यांना विस्मरण होऊ लागले होते. इतर कलाकारांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी त्या सतत संहिता वाचत असायच्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.
अलका कुबल, अभिनेत्री
सुलभाताई देशपांडे यांच्या निधनाने केवळ अष्टपलू अभिनेत्रीच नव्हे तर मराठी रंगभूमीबाबत कळकळ असलेली एक कार्यकर्तीही गमावली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. आपल्या सहज अभिनयाने नाटय़-चित्रपट आणि दूरचित्रवाणी गाजवणाऱ्या सुलभा देशपांडे यांनी प्रायोगिक रंगभूमी आणि बालनाटय़ चळवळ समृद्ध करण्यात मोलाचे योगदान दिले, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.
त्यांचे रंगभूमीवरील वावरणे असो की, प्रत्यक्षातील संवाद.. त्यामध्ये सहजता, सोपेपणा आणि मनाचा मोठेपणा जाणवायचा. त्यांच्या निधनाने एका अष्टपलू अभिनेत्रीला महाराष्ट्राने गमावले आहे, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
कलावंत आणि प्रेक्षकही घडवले!
अगदी लहानपणापासून सुलभाताईंच्या अॅक्टिव्हिटी मी जवळून पाहत आलोय की आज सुलभाताईंची ओळख कधीपासून कोणत्या दिवसापासून किंवा कोणत्या वर्षांपासून होती, हे मला सांगता येणार नाही. मी त्यांना सुरुवातीला नाटकात अभिनय करताना पहिले, त्यानंतर मालिका मग सिनेमात त्यांनी पुष्कळ काम केले. माझ्या दुष्टीने मात्र त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मला ‘रंगायन’ बंद झाल्यानंतर ‘आविष्कार’ या संस्थेच्या चळवळीत आणि जडणघडणीत त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जे योगदान आहे तो वाटतो. म्हणजे एका बाजूला अभिनेत्री आणि दुसऱ्या बाजूला उत्तम संचालिका हे खूप मोठे काम आहे, असे मला वाटते. त्यानंतर ‘चंद्रशाला’ काढून मुलांसाठी विजय तेंडुलकरांकडून लिहून घेऊन अनेक एकांकिका त्यांनी केल्या. त्यामुळे लहान मुलांची एक संबंध पिढी प्रेक्षक म्हणून आणि कलावंत म्हणून तयार झाली. सर्वात विशेष म्हणजे सुलभाताई उत्तम प्रेक्षकही होत्या. त्या नेहमी तिकीट काढून नाटक बघायच्या. त्यांचे म्हणणे, नाटकाला आपणच हातभार लावला पाहिजे. ‘ढोल-ताशे’ नाटकाचा शेवट आम्हाला सापडत नव्हता. म्हणजे त्यातला जो प्रमुख होता, तो हरेल अशी परिस्थिती होती. तर त्या म्हणाल्या, ‘‘ अरे त्यांच्या डोक्याला जी ‘गणपत्ती बाप्पा मोरया’ ही पट्टी लावली आहे ती काढा आणि त्याचे रडणे थांबवा.’’ आणि मी ते केले. त्यामुळे त्याला प्रेक्षकांची पसंती मिळायला लागली. त्यांनी विनोदी भूमिकेतील वैविध्यही जपले. लहानपणी त्यांच्या घरी आम्ही सगळे जाऊन दंगा करायचो तिथपासून आतापर्यंतचे सगळे आठवत आहे.
विजय केंकरे, निर्माता, दिग्दर्शक
रंगभूमीचे मोठे नुकसान
सुलभा ही अत्यंत गुणी अभिनेत्री होती. रंगभूमीची तिने प्रदीर्घकाळ निष्ठेने सेवा केली. तिच्या जाण्याने रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक रंगकर्मीला तिची अनुपस्थिती जाणवेल. सुलभा आणि अरविंद (देशपांडे) यांचे ऐकमेकांवर प्रेम जडले आणि नंतर त्यांनी लग्न केले. सगळे माझ्यासमोरच घडले.
विजया मेहता
सुलभा ही आमच्यासाठी अभिनयाची शाळाच..
सत्यदेव दुबे यांनी केलेला ‘शांतता कोर्ट सुरू आहे’ हा मराठी चित्रपट आणि याचेच हिंदी नाटक अशी माझी नाटक आणि चित्रपट कारकिर्द सुलभाताईबरोबर सुरू झाली. ती अप्रतिम अभिनेत्री आहे हे मला पहिल्याच क्षणी जाणवले. सुलभा आणि विजया मेहता ही आमच्यासाठी अभिनयाची दोन स्कूल्स, दोन्हीही तेवढीच दर्जेदार आणि ठसा उमटविणारी. ‘रामनगरी’ या हिंदी चित्रपटामध्ये सुलभाने माझ्या आईचे काम केले होते. यात आम्हा दोघांवर भजन चित्रीत झाले आहे. तिच्या निधनाचे वृत्त समजताच या आठवणी दाटून आल्या आणि आपण काय महत्त्वाचे गमावले याची जाणीव झाली. ल्ल अमोल पालेकर