लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : बहिणीच्या मुत्रपिंडाच्या आजारावर उपचार करण्यासाठी शेअर बाजारातून मोठा नफा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेची सायबर भामट्यांनी सुमारे ११.५० लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या फसवणुकीमुळे आजारी बहिणीने स्वतः साठवलेले पैसेही गेले.

४८ वर्षांची तक्रारदार महिला कांदिवली येथे राहत असून तिच्या लहान बहिणीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्यामुळे ती तिच्या आजारी बहिणीची विशेष काळजी घेते. मार्च महिन्यांत तिला समाज माध्यमांवर रोबो टेडिंगसंदर्भातील एक जाहिरात दिसली होती. शेअर खरेदीसह ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याची जाहिरात पाहून या महिलेला बहिणीच्या उपचारासाठी आशेचा किरण दिसला. त्या जाहिरातीमध्ये तीन मोबाइल क्रमांक होते. त्यामुळे तिने संबंधित मोबाइलवर संपर्क साधला.

आणखी वाचा-नाशिक, अहमदाबाद महामार्गांवर अवजड वाहतुकीस निर्बंध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

यावेळी समोरील व्यक्तीने तिचा विश्‍वास संपादन करताना तिला शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. तसेच तिला चांगला परतावा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे तिने बहिणीबरोबर चर्चा करून शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोघींनी शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मार्च ते जुलै २०२४ या कालावधीत तिने ३ लाख २० हजार, तर तिच्या बहिणीने ८ लाख २० हजार रुपये असे एकूण ११ लाख ४० हजार रुपये शेअरमध्ये गुंतवले. ही रक्कम या दोघींनी संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केली होती.

मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना परताव्याची रक्कम पाठविली नाही. त्यामुळे तिने संबंधित व्यक्तींकडे चॅटद्वारे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांच्याकडून तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी त्यांचे मोबाइल घेणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने कांदिवली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने तीन मोबाइल क्रमांक पोलिसांना दिले आणि संबंधितांविरोधात तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा कांदिवली पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करीत आहेत.

Story img Loader