कवी गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्राचे वर्णन ‘दगडांच्या देशा’ असे केलेले आहे. महाराष्ट्रातील कोरीव लेणी पाहिल्यानंतर ‘दगडांच्या देशा’ हे या प्रदेशाचे केलेले वर्णन खरोखरच आहे याची खात्री पटते. भिवंडीजवळील लोनाड येथे असलेली सातव्या शतकातील कोरीव लेणी पाहताना हा देश केवळ दगडांचा नाही तर दगडसौंदर्याचा आहे, असे वाटते. कातळात कोरलेले शिल्पसौंदर्य आणि गुहा म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी सोडल्यानंतर सोनोळे फाटा लागतो. या फाटय़ावरूनच लोनाडला जाता येते. लोनाडची लेणी एका टेकडीवर असून सोनाळे फाटय़ापासून अध्र्या तासाच्या अंतराने या टेकडीपर्यंत पोहोचता येते. या टेकडीच्या खाली एक मंदिर आहे. येथे वाहने उभी करून पुढे टेकडीवर मार्गक्रमण करावे लागते. या टेकडीवरून चढताना असे वाटतही नाही की या रस्त्यावर पुढे बौद्धकालीन सुंदर लेणी असतील. आजूबाजूचा परिसर रूक्ष आणि भकास. टेकडीवरून खाली पाहिले की काही ठिकाणी दगडखाणीची कामे सुरू असल्यासारखे वाटते.
टेकडीच्या मध्यभागी एक गुहा म्हणजेच चैत्य आहे. डोंगरात कोरलेली ही गुहा म्हणजे शिल्पसौंदर्याचा उत्तम नमुना. डोक्यावर उन्ह घेऊन ही टेकडी चढल्याने तुम्ही घामाघूम झाला असाल, तुम्हाला दम लागला असेल.. पण या गुहेत आल्यानंतर मात्र तुम्हाला अतिशय थंडगार वाटते. या गुहेच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला एक साधारण पाच ते सहा फूट उंचीचे दगडात कोरलेले प्राचीन शिल्प दिसते. मारुतीच्या मंदिरातल्या मूर्तीला जसा शेंदूर फासतात, तसा शेंदूर या शिल्पाला फासलेला आहे. हे शिल्प कसले आहे याबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही. पण या शिल्पात राजा, राणी आणि सेवक दिसतात. कोणत्या तरी राजाच्या दरबाराचे हे शिल्प असावे असे वाटते. आतमध्ये गुहेतही अनेक ठिकाणी शेंदूर फासलेल्या मूर्ती आढळतात. आतमध्ये भिंतीवर अनेक कोरीव शिल्पे आहेत. खांबावर आणि माथेपट्टीवरही कोरीव शिल्पे आहेत. या शिल्पात बऱ्याच देवता आहेत, तर काही कोरीव मूर्तीमध्ये तत्कालीन काळातील संस्कृती दिसते.
बाहेर वऱ्हांडा आणि आतमध्ये मोठे सभागृह अशी या गृहेची रचना आहे. वऱ्हांडय़ाला चार खांब आहेत. त्यापैकी काही खांब भग्नावस्थेत आहेत. गुहेच्या एका बाजूला पाण्याचे टांक आहे. रणरणत्या उन्हातही तिथे पाणी आहे. पण पाण्यात कचरा असल्याने ते पिण्यायोग्य नाही.
ही बौद्धकालीन लेणी असली तरी इतर लेण्यांप्रमाणे याचेही हिंदवीकरण झालेले दिसते. गुहेमध्ये दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात खांडेश्वरी देवीची मूर्ती आहे, तर दुसऱ्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे. प्राचीन काळी लोनाड हे बौद्धधर्मीय केंद्र होते. मौर्य राजकुळातील काळात ही लेणी बांधली असल्याचे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. बौद्ध भिक्खू त्या काळात या गुहेमध्ये आराम करत, असे बोलले जाते. मात्र कालांतराने तिथे मंदिर उभारण्यात आले.
भिवंडीजवळील रखरखीत आणि ओसाड ठिकाणी असलेले हे कातळशिल्प म्हणजे शिल्पसौंदर्याचा उत्तम नमुना. इतिहास आणि शिल्पकलेची आवड असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण.

कसे जाल?
* मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी सोडल्यानंतर सोनाळे फाटा लागतो. येथूनच लोनाडच्या लेण्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे.
* कल्याणहून भिवंडीला जाण्यासाठी बस सुटतात. आडबाजूला असल्याने या भागात जाण्यासाठी स्वत:चे वाहन असल्यास उत्तम.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trip to lonad caves