मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. तृष्णा विश्वासराव यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा यावेळी शिंदे यांनी केली.
वडाळा परिसरातील चार वेळा नगरसेविका म्हणून जिंकून आलेल्या तृष्णा या २०१७ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना नामनिर्देशित नगरसेविका म्हणून नियुक्त केले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आतापर्यंत यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, समाधान सरवणकर, संतोष खरात, दिलीप लांडे, परमेश्वर कदम, आत्माराम चाचे, वैशाली शेवाळे, भारती बावदाने, मानसी दळवी, अमेय घोले, किरण लांडगे, चंद्रावती मोरे, सुवर्णा करंजे या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.