आजवर अनेक चित्रपटांमधून आपण वेश्या व्यवसाय, त्यात इच्छेविरुद्ध अडकलेल्या मुली, त्यांना सहन करावा लागणारा त्रास पाहत आलो आहोत. चित्रपटाच्या माध्यमातून आपण या परिस्थितीची दाहकता अनुभवली असेल. परंतु या मुलींना प्रत्यक्षात जो त्रास सहन करावा लागतो त्याचा आपण विचारही करू शकत नाही. या मुलींसाठी अनेक संस्था काम करता. अशीच एक संस्था आहे रेस्क्यू फाउंडेशन. त्रिवेणी आचार्य यांनी आपल्या पतीला सोबतीला घेऊन २००० साली या संस्थेची स्थापना केली. रेडलाईट भागामध्ये अडकलेल्या मुलींना सोडवण्याचे, त्यांच्या हक्कासाठी लढण्याचे आणि त्यांच्यासाठी एक उज्ज्वल आयुष्य घडवण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. त्रिवेणी आचार्य यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या या असामान्य कार्याविषयी.
त्रिवेणी आचार्य यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आजवर ५ हजारपेक्षाही जास्त मुलींना सोडवलं आहे. त्यांच्या संस्थेमार्फत या मुलींसाठी वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जातात. तसेच, या मुलींच्या राहण्या-खाण्याची आणि शिक्षणाची सोयही येथे केली जाते. या असामान्य, धाडसी कामासाठी त्रिवेणी आचार्य आणि त्यांच्या संस्थेला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परंतु त्या करत असलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी कोणताही पुरस्कार पुरेसा नाही.
गोष्ट असामान्यांची या मालिकेचे इतर भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.