ऑनलाइन फसवणूक प्रकरण
मुलुंड येथील व्यावसायिक अंकुर कोराने यांना सुमारे एक कोटी रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याप्रकरणी अटक झालेल्या ट्रॉय परेरा या आरोपीच्या नावे वसईच्या आयडीबीआय बँकेत २० चालू खाती तसेच आयडीबीआय बँकेतील बचत खात्यासह इतर बँकांत सहा बचत खाती असल्याचेही आढळून आले आहे. याच बचत खात्यात कोराने यांचे ३० लाख हस्तांतरित झाले होते.
फसवणुकीप्रकरणी मुलुंड पोलिसांनी आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. यापैकी १६ जण मुंबईतीलच असून उर्वरित दोघे उत्तर प्रदेशातील आहेत. अद्यापही मुख्य सूत्रधार फरारी  आहे. कोराने यांच्या खात्यातील रक्कम हस्तांतरित करण्यासाठी इंद्रकुमार या आरोपीचा मोबाइल मुख्य सूत्रधाराने वापरला होता. या मोबाइलवरील इंटरनेटचा वापर करून सुरुवातीला त्याने कोराने यांचा आणि बँकेचा पासवर्ड हॅक केला आणि ४५ मिनिटांत विविध खात्यात एक कोटी हस्तांतरित केले. यापैकी ५७ लाख रुपये वाचविण्यात पोलिसांना आतापर्यंत यश आले आहे. या हस्तांतरणासाठी आयसीआयसीआय, येस बँक, एचडीएफसी, शामराम विठ्ठल बँकेत बनावट खाती उघडण्यात आली. त्यासाठी बनावट पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, शिधावाटप पत्रिका तयार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. परेराच्या २० चालू खात्यांबाबत पोलिसांनी बँकेकडे विचारणा केली असता, एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते, असे उत्तर बँकेने दिले. परेराची ही सर्व खाती वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावे असली तरी त्याचा कर्ताकरविता एकच होता. फसवणुकीसाठीच ही खाती उघडल्याचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा