मुंबई येथील धारावीमधील सायन-धारावी लिंक रोडवर गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीनंतर सिलेंडरचे अनेक स्फोट देखील झाले. दरम्यान मुंबई अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-२ ची असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान ट्रकला आग लागल्यानंतर एकापाठोपाठ एक असे सिलिंडरचे अनेक स्फोट झाल्याने आगीचा एकच भडका उडाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी आग काही वेळातच आटोक्यात आणली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

पोलिसांनी काय सांगितलं?

धारावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निसर्ग उद्यानच्या बाजूला गॅस सिलिंडरने भरलेले वाहन उभे होते. संध्याकाळी पाऊणे दहा ते १० च्या दरम्यान यामध्ये आग लागली. आगीची माहिती मिळाल्याबरोबर पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले. अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी आली. वाहने आल्यानंतर अग्निशमक दलाच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणली. यामध्ये एकही व्यक्ती जखमी झालेला नाहीये. यामध्ये साधारणपणे चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती मिळत आहे, असे घटनास्थळी पोहचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

घटनेच्या कारणाबद्दल अद्याप कोणतीही गोष्ट स्पष्ट झाली नाही, चौकशी केल्यानंतर त्याबद्दल माहिती देऊ असेही पोलिसांनी सांगितले.