मुंबई: पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड – विक्रोळीदरम्यान सोमवारी पहाटे कचरा घेऊन जाणाऱ्या महापालिकेच्या वाहनाला ट्रकने धडक दिली. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर तब्बल चार तास वाहतूक कोंडी झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने घटनास्थळावरून हटविल्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.
मुलुंड – विक्रोळीदरम्यान सोमवारी पहाटे ६ च्या सुमारास ही घटना घडली. ठाणे येथून एक ट्रक रेती घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. या ट्रकने मुलुंड – विक्रोळीदरम्यान कचरा घेऊन जाणाऱ्या महापालिकेच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने ठाण्याहून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या.
ठाण्याहून मुंबईच्या दिशेने रोज हजारो वाहने येतात, मात्र या अपघातामुळे मुलुंडपासून विक्रोळीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांना तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यात आली. त्यानंतर या परिसरातील वाहतूक सुरळीत झाली. मात्र तोपर्यंत वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागले.