मात्र ‘मझार’ प्रवेश दूरच!
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गुरुवारी भल्या सकाळी हाजीअली दग्र्यामध्ये अचानकपणे जाऊन प्रार्थना केली. मात्र महिलांना जेथपर्यंत प्रवेश आहे, तेथेच त्यांना जाऊ देण्यात आले. त्यांना महिलांना प्रवेशबंदी असलेल्या ‘मझार’पर्यंत जाण्यापासून रोखण्यात आल्याने आपला लढा सुरूच राहणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
केवळ महिला आहे म्हणून मंदिर किंवा दग्र्यामध्ये कोठेही मनाई असू नये, ही भूमिका घेऊन देसाई यांनी आंदोलने सुरू केली आहेत. शनिशिंगणापूर, कोल्हापूर येथील मंदिर प्रवेशातील र्निबध त्यांच्या आंदोलनानंतर हटविण्यात आले. पण हाजीअली दर्गा येथे मझापर्यंत जाण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेला प्रयत्न असफल झाला. जोरदार विरोधामुळे पोलिसांनी त्यांना रोखले होते. तेव्हा गनिमीकावा करून दग्र्यात घुसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार देसाई आज सकाळी लवकर हाजीअली दर्गा येथे पोचल्या. कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यांनी दर्शन घेऊन दुवा केली. मात्र मझापर्यंत जाण्यास महिलांना मनाई असल्याने त्या तेथे गेल्यास त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतील, असे सांगत पोलिसांनी त्यांना रोखले.