शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी केरळमध्ये दाखल झालेल्या भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना कोचीन विमानतळावरुनच मुंबईत परतावे लागले. दरम्यान, मुंबई विमानतळाबाहेर शुक्रवारी शबरीमला मंदिर प्रथा समर्थकांनी देसाईंविरोधात निषेध नोंदवला.


शबरीमला मंदिरात प्रवेशाची जाहीर घोषणा करीत तृप्ती देसाई यांनी गुरुवारी केरळकडे प्रस्थान केले होते. शुक्रवारी पहाटे त्या कोचिन विमानतळावर पोहोचल्या मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केरळ सरकारने त्यांना विमानतळावरच रोखले. मंदिराकडे त्यांना जाऊही दिले नाही. त्यामुळे मंदिर प्रवेश न करताच त्यांना पुन्हा महाराष्ट्रात परतावे लागले. त्यानुसार, मुंबई विमानतळावर परतल्यानंतर त्यांच्यासमोर शबरीमला मंदिर प्रथेचे समर्थन करणाऱ्यांनी निषेध नोंदवला.


मुंबई परतल्यानंतर विमानतळावर निषेधकर्त्यांनी तृप्ती देसाईंविरोध घोषणाबाजी केली. तसेच देसाईंची पन्नाशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शबरीमला मंदिरात जायला हरकत नाही. त्यापूर्वी नको अशी भुमिका या निषेधकर्त्यांनी नोंदवली. तसेच मंदिरात प्रवेश रोखण्यासाठी अनेक भाविक महिला काम करीत आहेत. शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी अनेक भाविक महिल्या आल्या होत्या. मात्र, त्यांना पुढे जाऊ दिलेले नाही, असे यावेळी निषेधकर्ते सांगत होते.

स्त्री-पुरुष समानतेच्या तत्वानुसार, शबरीमला मंदिर प्रशासन महिलांना प्रवेश नाकारु शकत नाही, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. त्यानुसार, आजवर अनेक महिलांनी मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न केले मात्र, त्यांचे हे प्रयत्न आंदोलकांकडून हाणून पाडण्यात आले.