मुंबईतील मुलुंड या उपनगरात तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने घर नाकारण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच तृप्ती देवरुखकर यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. आज (२९ सप्टेंबर) तृप्ती देवरुखकर शिवतीर्थवर शर्मिला ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आल्या. या भेटीनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
तृप्ती देवरुखकर म्हणाले, “मराठी माणसाला घर नाकारण्याचा अनुभव आल्यानंतर मला सर्वात आधी स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क केला. ते माझ्याबरोबर आले आणि घर नाकारणाऱ्या सचिवाला जाब विचारला. मला त्यांच्याकडून मराठीत माफी हवी होती. माझी दुसरी कोणतीच अपेक्षा नव्हती.”
“घर नाकारणाऱ्या सचिवाने मराठीत माफी मागितली”
“मराठी माणसाला घर नाकारलं म्हणून त्या इमारतीच्या सचिवांनी माझी आणि सर्व मराठी माणसांची मराठीत माफी मागावी, अशी माझी अपेक्षा होती. त्यांनी मराठीत माफी मागितली,” अशी माहिती तृप्ती देवरूखकर यांनी दिली.
“मनसैनिक सर्वात आधी आमच्या मदतीला आले”
तृप्ती देवरूखकर पुढे म्हणाल्या, “शर्मिला ठाकरे यांनी मला भेटण्याची वेळ दिली. कारण मला त्यांचे आभार मानायचे होते. मनसैनिक सर्वात आधी आमच्या मदतीला आले. त्यानंतर सर्व पक्ष आले. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तेव्हा सर्वच पक्ष तेथे आले. मात्र, सुरुवातीला मनसैनिकांनी मदत केली.”
” शर्मिला ठाकरे यांनी माझं कौतुक केलं”
“मी धाडसाने पुढे आले म्हणून शर्मिला ठाकरे यांनी माझं कौतुक केलं. कारण अनेक मराठी लोकांबरोबर हे प्रकार घडतात, मात्र कुणी बोलत नाही,”
नेमकं हे प्रकरण काय आहे?
तृप्ती देवरुखकर नावाच्या एका महिलेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मुलुंड वेस्टमधल्या ‘शिवसदन’ नावाच्या इमारतीमध्ये घर बघण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र, सोसायटीचे गुजराती सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी “महाराष्ट्रीयन व्यक्तींना आम्ही घर देत नाही” असं सांगून नकार दिला. यातून वाद वाढला व देवरुखकर यांनी त्या बाचाबाचीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करायला सुरुवात केली. पण त्यावरूनही या बापलेकानं अरेरावी करत त्यांचा मोबाईल काढून घेतला. त्यांनी आपल्या पतीलाही मारल्याचा दावा तृप्ती देवरुखकर यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये केला आहे.
हेही वाचा : मुंबईतल्या मराठी महिलेला ‘मराठी’ म्हणून हिणवत घर नाकारणाऱ्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
घडला प्रकार तृप्ती देवरुखकर यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर मनसेनं त्याची दखल घेऊन थेट शिवसदन सोसायटी गाठली. त्यांनी मला त्या सोसायटीत बोलवून घेतलं आणि त्या दोघांनाही जाब विचारला. त्या दोघांनी माफीही मागितली. आपण मनसे पदाधिकाऱ्यांचे आभारी आहोत, असं तृप्ती देवरुखकर यांनी नंतर पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करून सांगितलं.