कधीकाळी नारायण राणेंना निवडणुकीत पराभवाचं पाणी पाजणाऱ्या माजी आमदार तृप्ती सावंत याच आज नारायण राणेंच्या स्वागतासाठी कलानगर म्हणजेच मातोश्रीच्या अंगणात सज्ज असल्याचं पाहायला मिळालं. जन आशीर्वाद यात्रेसाठी नारायण राणे सध्या मुंबईत असून त्यांनी मातोश्रीच्या अंगणातूनच जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी कधीकाळी शिवसेनेत असताना नारायण राणेंचा विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत या आता भाजपामध्ये असून त्यांनीच नारायण राणेंचं केंद्रीय मंत्री म्हणून स्वागत केलं.
तृप्ती सावंत यांनी याच वर्षी एप्रिल महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिष्टाचारानुसार केंद्रीय मंत्र्यांचं कलानगरमध्ये स्वागत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देखील येऊन पडली. तृप्ती सावंत यांनी देखील नारायण राणेंचं कलानगरमध्ये जंगी कार्यक्रम करून स्वागत केलं. यावेळी “बाळासाहेब ठाकरे आज हयात असते,, तर त्यांना शिवसैनिकांचं हे वागणं अजिबात आवडलं नसतं. आपला जुना शिवसैनिक मोठा होतोय याचं स्वागत व्हायला हवं. आम्ही शिवसेनेपासून दुरावलो असलो, तरी बाळासाहेबांपासून कधीही दुरावणार नाही”, असं यावेळी तृप्ती सावंत म्हणाल्या.
काय घडलं होतं २०१५मध्ये?
२०१५मध्ये शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार, सेनेचे निष्ठावंत नेते आणि तृप्ती सावंत यांचे पती बाळा सावंत यांचं निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेनं तृप्ती सावंत यांनाच तिकीट दिलं. या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस नेते आणि पूर्वीचे कट्टर शिवसैनिक नारायण राणे यांनी मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला पराभूत करण्याची घोषणा केली होती. पण तब्बल २० हजार मतांनी तृप्ती सावंत जिंकून आल्या.
२०१९ला तिकीट नाकारलं…
२०१५मध्ये माजी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या तृप्ती सावंत यांना शिवसेनेनं २०१९च्या निवडणुकांमध्ये मात्र तिकीट नाकारलं. मातोश्री हे शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान असलेला कलानगर भाग ज्या वांद्रे पूर्व मतदारसंघात येतो, तिथूनच तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. मात्र, २०१९मध्ये त्यांना तिकीट नाकारून मुंबई पालिकेचे तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण त्या पराभूत झाल्या.
“उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच या राज्याला…”, नारायण राणेंचा जन आशीर्वाद यात्रेच्या सुरुवातीलाच निशाणा!
६ एप्रिल २०२१ रोजी माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पुढील वर्षी मुंबईत होणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये तृप्ती सावंत शिवसेनेसमोर मातोश्रीच्या अंगणातच मोठं आव्हान निर्माण करू शकतात.